Girish Mahajan Pudhari
नाशिक

Girish Mahajan | नाशिकमध्ये 'विकसित भारत संकल्प सभा' उत्साहात; पालकमंत्री गिरीश महाजन यांचे राष्ट्रनिर्मितीचे आवाहन

Girish Mahajan | नाशिकमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपची 'विकसित भारत संकल्प सभा'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नाशिक महानगरातर्फे राबवण्यात येत असलेल्या 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत 'विकसित भारत संकल्प सभा' आणि 'सेवा ज्योती कलश यात्रा' बुधवारी (दि. ७) उत्साहात पार पडली. 'विकसित भारत @ २०४७' हे पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर ठेवलेले ध्येय साकारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

वसंतस्मृती कार्यालयामध्ये महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महाजन म्हणाले की, मोदी यांनी २५ वर्षांच्या सेवासंकल्पातून देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी सेवा, संघटन आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेतून जनतेपर्यंत पोहोचून विकसित भारताच्या संकल्पतेला व्यापक जनसहभाग मिळवून द्यावा, असे आवाहन केले.

यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार निशिगंधा मोगल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आहेर-आडके, ज्येष्ठ नेते विजय साने, महेश हिरे, सरचिटणीस सुनील देसाई, गटनेते श्याम बडोदे, सरचिटणीस रश्मी हिरे - बेंडाळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण भाटे, महिला मोर्चाध्यक्षा स्वाती भामरे उपस्थित होते.

पंचवटीतून बाइक रॅली:

पंचवटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राबवण्यात येत असलेल्या 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत नाशिकमध्ये 'सेवा ज्योती यात्रा' बाइक रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. भाजपच्या तपोवन मंडल व पंचवटी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटी कारंजा येथून रॅलीला सुरुवात झाली.

पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल आणि शालिमारमार्गे ही रॅली वसंतस्मृती येथील भाजप शहर कार्यालयात पोहोचली. तिथे वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सेवा ज्योती प्रज्वलन करीत पंतप्रधान मोदी यांच्या सेवा व विकासकार्याचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमाचे नेतृत्व तपोवन मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, पंचवटी मंडळाचे अध्यक्ष बबन ढोक यांनी केले. सेवा हाच संकल्प या ध्येयाने आयोजित यात्रेत लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

कर्तृत्ववानांचा सन्मान:

सेवा संकल्प अभियानानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेतील कार्याबद्दल सविता दातीर, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आकाश शिंदे, नेमबाजीतील छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रद्धा नालमवार, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा सत्कार करण्यात आला.

रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव:

'विकसित भारत' या संकल्पनेवर आधारित रील स्पर्धेलाही युवा वर्गाचा प्रतिसाद मिळाला. उत्कृष्ट रील सादर केल्याबद्दल शुभम वाघ, सार्थक साबळे आणि तन्मय साबळे यांचा महाजन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना, विकासकामे आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश युवकांनी समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.

सेवा ज्योती कलश यात्रेत उत्साह:

विकसित भारत संकल्प सभेनंतर 'सेवा ज्योती कलश यात्रे'ला सुरुवात झाली. ईदगाह मैदानमार्ग अनंत कान्हेरे मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेत भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनंत कान्हेरे मैदानावर यात्रेचा समारोप झाला. यावेळी रांगोळी प्रदर्शनास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले.

पिंपळगावमध्ये कार्याचा गौरव:

पिंपळगाव बसवंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनापासून सुरू असलेल्या 'राष्ट्रसेवा' उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे भारतीय जनता पक्षाने 'विकसित भारत संकल्प व सेवा उत्सव' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बाजारपेठेतील गणपती मंदिरासमोर करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम, नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, वैकुंठ पाटील, वैशाली पवार, प्रतिमा मोरे, अंजली चौहान, गोविंद कुशारे, अभय बलदोटा, प्रकाश घोडके, एल. के. मोरे, राहुल विधाते, प्रशांत मोरे, दत्तात्रय काळे, प्रशांत घोडके, श्यामराव मोरे, नारायण जाधव, मयूर गावडे, नीलेश शेळके, नीलेश सोनवणे यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT