Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal | 'स्वीकृत नगरसेवक'चा अट्टहास केदार यांना भोवला

BJP Internal Rift Co Opted Corporators - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. 'स्वीकृत' पदी संधी न मिळाल्याने नाराज असलेले शहराध्यक्ष सुनील केदार यांनी नियुक्त्तीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यास टाळाटाळ केल्याने प्रदेश नेतृत्वाने त्याची गंभीर दखल घेत याच मुद्द्यावरून चव्हाण यांनी केदार यांची कानउघाडणी करत त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केदार यांनीही राजीनाम्याचे वृत्त फेटाळल्याने भाजपमधील या घडामोडींबाबत संभ्रम कायम आहे.

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत विरोधकांना अडचणीत आणण्याची रणनीती आखणाऱ्या भाजपलाच आता अंतर्गत नाराजीने घेरले आहे. पक्षाच्या वाट्याला आलेल्या सहा स्वीकृत जागांसाठी तीनशेहून अधिक इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवारांची नावे अंतिम केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यात शहराध्यक्ष केदार यांनाही विश्वासात घेतले नसल्याची चर्चा असून, स्वतः केदार हेही 'स्वीकृत'साठी इच्छुक असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या संघटनात्मक पद्धतीनुसार स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करताना प्रदेश नेतृत्वाची संमती घेणे आणि अंतिम यादी प्रदेशाध्यक्षांना कळविणे अपेक्षित असते. मात्र, केदार यांनी नियुक्तीबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केदार यांना बोलावून घेत अहवाल सादर न करण्यामागचे कारण विचारल्याचे समजते. यावेळी झालेल्या चर्चेत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने केदार यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा पक्ष वर्तुळातून आहे.

दरम्यान, या 'कथित' कारवाईला पक्षाकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. केदार यांनीही राजीनाम्याचे वृत्त अमान्य केले आहे. त्यामुळे भाजपमध्ये नेमके काय घडले, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे.

महापौर निवडीवेळीही राजीनाम्याचे अस्त्र

महापौरपदाच्या निवडीवेळीही केदार यांनी आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने निश्चित केलेली नावे आणि आपण सुचविलेली नावे वेगळी असल्याचे सांगत त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना मोबाइलवर संदेश पाठवून राजीनामा सादर केला होता. त्यावेळीही त्यांच्या नाराजीचा रोख पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याची चर्चा होती. आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीतही डावलले गेल्याने केदार पुन्हा नाराज झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महापालिकेतील सत्ताकारणापेक्षा भाजपमधील अंतर्गत राजकारणाचीच अधिक चर्चा रंगू लागली आहे.

काहीच घडलेले नाही. या विषयावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मी नियमितपणे पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे. राजीनाम्याचा कोणताही विषय नाही. प्रदेश पातळीवरूनही मला याबाबत विचारणा झालेली नाही

- सुनील केदार, शहराध्यक्ष भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT