नाशिक : गुन्हा मागे घेताच शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा येत्या रविवारचा (दि. २७) मुहूर्त निश्चित झाला आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी आयोजित भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला या द्वयींनी हजेरी लावली.
सुधाकर बडगुजर यांच्यापाठोपाठ भाजपने 'उबाठा'तील माजी नगरसेवकांचा मोठा गट फोडल्यानंतर सुनील बागूल, मामा राजवाडे यांनाही गळाला लावले. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्याच्या प्रकरणात हे दोघे पोलिसांच्या लेखी फरार असल्याच्या मुद्द्यावर खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे संबंधितांचा प्रवेश भाजपने लांबणीवर टाकला होता; परंतु, त्या तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्याने विघ्न टळले आहे. येत्या रविवारी (दि.२७) दुपारी १ वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत आहे.
प्रवेशापूर्वीच बागूल, राजवाडे यांनी भाजप कार्यालयात हजेरी लावली. ऐवढेच नव्हे तर बागूल यांना थेट भाजपच्या कोअर कमिटीत मानाचे स्थान देण्यात आले. शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह मंडल अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी प्रवेशाच्या तयारीसह महापालिका निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवकही प्रवेश करणार असल्याचा दावा बागूल यांनी केला आहे. माझ्यासोबत अजून इतर पक्षांचे देखील काही लोक येणार आहेत. पण, त्यांची नावे अजून निश्चित झालेली नाहीत, असे नमूद करत काँग्रेससोबतच विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून गेलेले काही पदाधिकारी देखील प्रवेश करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. बागूल यांच्यापाठोपाठ शाहु खैरे, संजय चव्हाण, ॲड. यतीन वाघही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. परंतू, या तिघांनीही प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
भाजपच्या विविध मंडळाचे पदाधिकारी, कोअर कमिटीचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक झाली. २७ तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. पदाधिकारी कोण-कोण येतील? वरिष्ठ पदाधिकारी कोण असतील? या सगळ्या गोष्टींवर या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.सुनिल बागूल, माजी उपनेते, ठाकरे गट