नाशिक : छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलल्याने संतप्त झालेल्या समर्थकांनी बुधवारी (दि. १८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भुजबळांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची गळ घातली. तर काहींनी ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढा, असा सल्ला देत कायम सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. एका समर्थकाने तर चक्क विरोधी पक्षनेते होण्याची सूचना भुजबळांना केली.
भुजबळांच्या उपस्थितीत राज्यभरातील समता परिषद, ओबीसी समर्थकांचा मेळावा बुधवारी (दि. १८) नाशिकमधील जेजूरकर लॉन्स येथे पार पडला. यावेळी भुजबळ समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस राजेंद्र महाडोळे यांनी भुजबळांना मंत्रिमंडळाबाहेर ठेऊन ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट रचला गेल्याचा आरोप केला. तुम्ही ओबीसींचे राष्ट्रीय नेते आहात. राष्ट्रवादीच्या नादी लागू नका, भाजपमध्ये प्रवेश करा, तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यावेळी उपस्थित समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी करत, भुजबळांनी भाजपमध्ये जाण्याच्या सूचनेला अनुमोदन दिले.
मंत्रिमंडळात अनेक ओबीसींना स्थान दिल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. मात्र, आम्हाला दुसरा ओबीसी नेता मान्य नाही, ते विद्यार्थी असून भुजबळ ओबीसींचे प्राचार्य आहेत. त्यामुळे हा आवाज कॅबिनेटमध्ये नसेल तर, हा अन्याय व आक्रोश गावागावापर्यंत जाईल असा इशारा ॲड. मंगेश ससाणे यांनी दिला. डॉ. कैलास कमोद यांनी अजित पवारांच्या निषेधाचा ठराव मांडला. भुजबळांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असू शकत नाही. भुजबळांशिवाय राज्य चालू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला सत्येत बसावे लागेल, अशी सूचना शिवाजीराव नलावडे यांनी केली. पार्वती शिरसाठ यांनीही भुजबळांनी ओबीसींच्या न्यायासाठी भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पांडूरंग मिरगळ यांनी भुजबळांनी नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह विविध समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
ओबीसी समाजाने महायुतीला राज्यात बहुमत मिळवून दिले. भुजबळ आणि गोपिचंद पडळकरांच्या प्रयत्नांमुळेच हे घडू शकले. परंतु, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी कोणाचे तरी ऐकून दोघांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असा आरोप करत भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा दाखवून देवू, असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला. तर, जोपर्यंत भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले जात नाही तोपर्यंत महायुतीच्या नेत्यांना गावबंदी करा, अशी सूचना धनगर समाजाचे नेते दीपक बोरोडे यांनी केली. एका पवाराने सावता महाराजांचा अवमान केला. दुसऱ्याने ओबीसी नेत्याची अवहेलना केली, असे सांगत शंकरराव लिंगे यांनी पवारांचा निषेध केला.
अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी विश्वासघात केल्याचा बॅनर घेऊन समर्थक मेळाव्यासाठी दाखल झाले होते. संपूर्ण ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही अशा आशयाचे बॅनर्स मेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आले होते. याशिवाय संघर्ष योद्धा, जननायक, बहुजन नायक, ओबीसीचा बुलंद आवाज, ओबीसी योद्धा, बात सन्मान की है, झुकेगा नही, बाप माणूस यासह विविध फलक समर्थकांकडून झळकावण्यात आले. 'भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'नहीं चलेगी नहीं चलेगी 'दादा'गिरी नहीं चलेगी', अशा घोषणांनी समर्थकांनी परिसर दणाणून सोडला.
विदर्भ ब्राह्मण विकास मंच, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन, जयभीम ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य विणकर समाज संघटना, महाराष्ट्र नाभिक मंडळ, महाराणा प्रताप क्षत्रिय समाज, आदिवासी, ब्राम्हण समाज यासह विविध संस्था संघटना आणि समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.