नाशिक

West Bengal Assembly Elections | बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! नाशिकमध्ये ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष, गिरीश महाजनांनी धरला ठेका

मंत्री महाजनांसह भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात धरला ठेका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव केल्यानंतर नाशकात भाजपने जोरदार जल्लोष साजरा केला.

कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर वसंतस्मृती ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. तेथे इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होत आहे.

भाजपच्या दमदार विजयाबद्दल नाशिक महानगरतर्फे पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकत्यांनी भाजपचे झेंडे हाती घेत ठेका धरला. मंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आ. सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदींसह मंडल अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात अराजक माजले होते. भ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दंडेलशाही, सर्वसामान्यांवर अन्याय व अत्याचार यांनी कळस गाठला होता. तेथील अराजकता पाहता पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

भारताचे संविधान राजरोस उघडपणे पायदळी तुडवले जात होते. अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही परिस्थितीत ममता बॅनर्जी यांचे सरकार पायउतार होणे ही देशाची व काळाची गरज होती. क्रांतिभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य म्हणून पश्चिम बंगालचे नाव आहे. हे नाव पुन्हा नावलौकिक व्हावे म्हणून यापुढे भाजप काम करील, असे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.

बंगालमधील हुकूमशाही संपुष्टात : महाजन

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपला कौल देऊन ममता बॅनर्जी यांची दादागिरी आणि हुकूमशाही तेथील जनतेने संपुष्टात आणली आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे, हे या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजपसाठी हा आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मंत्री महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. बंगालमधील विजयाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांना दिले. बोगस मतदानातून ममता बॅनर्जी या आतापर्यंत निवडणुका जिंकत होत्या. त्यांनी बंगालचा विकास रोखला होता. त्यामुळे अन्याय आणि दडपशाही विरोधात पश्चिम बंगालच्या जनतेने निवडणुकांच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. आता खऱ्या अर्थान आता बंगालचा विकास सुरू होणार असून, यापुढे ममतादीदींचे नावदेखील कोणी घेणार नाही, असा दावा महाजन यांनी केला आहे.

आतापर्यंत ममतादीदींनी विकास थांबवला होता. यापुढे नरेंद्र मोदी आणि अमित शाह मोठ्या प्रमाणात विकास करतील, असा दावाही त्यांनी केला. तमिळनाडूत जे लोकप्रिय आणि अभिनेते असतात, त्यांनाच यश मिळत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो असेही त्यांनी नमूद केले. राज्यात आणि देशात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही पक्षावर विश्वास राहिला नसल्याचा दावा महाजन यांनी केला.

बारामती विधानसभेत सुनेत्रा पवार या विक्रमी मतांनी निवडून येणार असून, राहुरीची जागादेखील आम्ही जिंकत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लाठीचार्जबाबत शेतकऱ्यांशी संवाद रिंगरोडच्या भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगत, याबाबत मी शेतकरी आणि पोलिस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण काढताना तसेच भूसंपादन करताना कोणाचेही नुकसान आम्ही होऊ देणार नाही. ज्याचे नुकसान होईल, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असा दावाही महाजन यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT