नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात नवजात शिशुंसाठी अत्याधुनिक व सुसज्ज कक्ष उभारण्यात आला असून, लवकरच तो नवजात शिशुंच्या सेवेत दाखल होणार आहे. या कक्षात खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधामुळे आता सर्वसामान्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिशुकक्षात एकूण २५ नवजात बाळांसाठी अत्याधुनिक काचेच्या इन्क्युबेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बाळासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, स्वच्छता व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
तसेच मातांसाठी स्वतंत्र व सुसज्ज विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात आल्याने आई बाळाची एकत्रित काळजी घेणे अधिक सुलभ होणार आहे. कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची स्वतंत्र व्यवस्था असून, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ २४ तास सेवेत राहणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आली आहे.
या सुविधेमुळे नाशिकरोडसह ग्रामीण भागातील नवजात शिशुंच्या आरोग्यसेवेत मोठी भर पडणार आहे. हे शिशुकक्ष सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, सुरू झाल्यानंतर गरीब व सर्वसाधारण कुटुंबांसाठी ते जीवनदायी ठरणार आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात अत्यंत सुसज्ज शिशुकक्ष उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही सुविधा नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरणार असून, मातांना व बाळांना योग्य उपचार मिळतील. विशेषतः मध्यमवर्गीय व गरजू रुग्णांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल.डॉ. कांचन लोकवाणी, सहायक वैद्यकीय अधीक्षक, बिटको रुग्णालय