नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड येथील बिटको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कथित गैरव्यवहार, मनमानी कारभार आणि कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्रस्टमधील पुजारी, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करत ट्रस्टच्या कारभाराची सखोल चौकशी करून तातडीने प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.
नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिर व बिटको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गेल्या वर्षभरापासून ट्रस्टी मोहन चव्हाण आणि कर्मचाऱ्यांमध्ये सातत्याने वाद सुरू आहेत. हा वाद आता सार्वजनिक पातळीवर आल्याने ट्रस्टच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंदिरातील पुजारी, व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचारी आदींनी पत्रकार परिषद घेत ट्रस्टींवर आरोप केले.
या वेळी मंदिरातील कर्मचारी नाना पवार, संजय उन्हवणे, सुरेश मानकर, संजय बेळेकर, सुहास लोळगे, अशोक दराडे, तुकाराम निमसे, विजय खर्जुल, सुशीला जोशी, जयंत मिश्रा, दामोदर वाघमारे, शांताराम साळवे, सीताराम राजहंस यावेळी उपस्थित होते. पुजारी कृष्णानंद मिश्रा यांनी ट्रस्टींकडून मानसिक त्रास, दमदाटी व अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे सांगितले.
काही कर्मचाऱ्यांवर मारहाणीचे प्रकार घडल्याचा दावा करत, याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याची माहिती देण्यात आली. अपंग गुरुजींना मारहाण व धमकी देण्यात आल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले. व्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी यांनी अचानक कामावरून कमी केल्याचा आरोप करत, ट्रस्टमधील कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांसह मुख्यमंत्री यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवरही तक्रार दाखल केली असल्याची माहिती देत या ठिकाणी प्रशासक नेमण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
हे आहेत आरोप
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरातील दानपेटी, भक्तनिवास गृह व इतर माध्यमांतून जमा होणाऱ्या रकमेचा कोणताही लेखाजोखा ठेवला जात नाही. शासकीय नियमांचे उल्लंघन करून ही रक्कम वापरली जात असून, भाविकांच्या दानाचा अपव्यय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विश्वस्तांनी आरोप फेटाळले
ट्रस्टी मोहन चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण अधिकृत विश्वस्त असल्याचे स्पष्ट केले. सर्व व्यवहार नियमाप्रमाणे असून, संबंधित कागदपत्रे न्यायालय व धर्मादाय आयुक्तांकडे सादर केली जातील, असे त्यांनी सांगितले.
२५ वर्षांहून अधिक काळ मंदिरात सेवा देत असताना ट्रस्टींकडून चुकीची वागणूक मिळत आहे. ट्रस्टच्या पैशांचा अपव्यय होत असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या ट्रस्टवर प्रशासक नेमावेत.- राजेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापक
ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याने आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर आम्हाला त्रास दिला जात असून, माझ्या अपंगत्वावरही हिणवले जाते. तर मला धक्काबुक्कीदेखील केली आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- कृष्णानंद मिश्रा, पुजारी