नाशिक : बाह्यस्रोत भरतीप्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी बिर्हाड आंदोलकांसह सकल आदिवासी समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 25) काढण्यात येणार्या उलगुलान जनआक्रोश मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, फलक तयार करणे, आमदार, खासदार आदींच्या भेटी घेऊन त्यांना मोर्चासाठी आमंत्रण देणे, भूमिका समजावून सांगणे आदी कामे करण्यात येत आहेत. बिर्हाड आंदोलकांनी या कामांसाठी कोअर कमिटी केली असून, या कमिटीमार्फत कामे करण्यात येत आहेत.
बिर्हाड आंदोलनाचा शनिवारी (दि. 23) 46 वा दिवस असून, बिर्हाडने पेसा आंदोलनाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. पेसा आंदोलन हे 45 दिवस सुरू होते. सोमवारी (दि. 25) तपोवनातील मोदी मैदानावरून मोर्चा निघणार असल्याने यासाठी नाशिकच्या आसपासच्या गावांतील आदिवासी समाजाच्या वतीने गायी, म्हशी, शेळ्या, बकर्या, कोंबड्यांसह संपूर्ण कुटुंबीयांसह सामील व्हावे असे आवाहन सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोर्चाचे नेतृत्व आदिवासी समाजाचे आमदार, खासदार करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आदींची भेट घेत रोजंदारी कर्मचारी म्हणून पुन्हा पत्र द्यावे अशी मागणी केली आहे. मात्र, सर्व ठिकाणी रोजंदारी कर्मचार्यांना निराशा हाती आली. मात्र तरीही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. आदिवासी प्रशासनाने रोजंदारी कर्मचारी वर्ग 3 आणि 4 संदर्भात टेंडर काढून दोन कंपन्यांना काम दिले असून, रोजंदारी कर्मचार्यांची पदे भरण्याचे काम सुरू केले आहे. या कंपन्यांनी पुन्हा आंदोलनास बसलेल्या कर्मचार्यांनाच आदेश काढून कामावर हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, आम्हास कंपन्यांचे आदेश नको, तर प्रशासनाचे आदेश हवेत अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. 25) काढण्यात येणार्या जनआक्रोश उलगुलान मोर्चासाठी जवळपास 3 ते 5 हजार आदिवासी सहभागी होतील असा अंदाज आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.