नाशिक : बाह्यस्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करा, आमची हक्काची नोकरी आम्हाला द्या या मागण्यांसाठी रोजंदारी कर्मचारी गत 48 दिवसांपासून आंदोलनावर आडून बसले आहेत. आदिवासी प्रशासनाला जाग आणण्यासाठी सोमवारी (दि.25) आंदोलकांनी आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला. मोर्चात 40 आदिवासी संघटना सामील झाल्याने मोर्चाला मोठे स्वरुप आले होते.
तपोवनातील मोदी मैदानावरुन मोर्चा सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाला. मोदी मैदान, छत्रपती संभाजी नगर नाका, निमाणी, पंचवटी, मालेगाव स्टॅण्ड, रविवारी कारंजा, एमजीरोड, जिल्हाधिकारी कार्यालयावरुन आदिवासी आयुक्तालयावर दुपारी साडेचारच्या दरम्यान हा मोर्चा पोहोचला.
बिरसा मुंडा करे पुकार, ऊलगुलान ऊलगुलान, नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आदी घोषणा देत मोर्चा आदिवासी आयुक्तालयावर पोहोचला. मोर्चात किमान एक हजार आदिवासी बांधव सामील झाले होते. मोर्चासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चात सुरगाणा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीही सामील झाले. आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारी वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. शिक्षण आणि जेवण या दोन्हीबाबत समस्या निर्माण होत आहे. रोजंदारी कर्मचारी नसल्याने इगतपुरीत आश्रमशाळा बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे मोर्चात आदिवासी बांधवांसह विद्यार्थीही सहभागी झाले.