नाशिक : बाह्यस्रोत भरतीची अधिसूचना रद्द करून सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र आदिवासी रोजंदारी कर्मचारी संघटना(वर्ग ३ व ४) च्या वतीने नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाला सोमवारी (दि. २८) २० वा दिवस उजाडला. संतप्त झालेल्या आंदोलकांनी सोमवारी (दि. 28) दुपारी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयासमोर लावलेले बॅरिकेड्स ढकलून आयुक्त कार्यालयात प्रवेशाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनुचित प्रकार टळला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मागील २० दिवसांपासून आंदोलकांनी आयुक्त कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. मात्र, या प्रश्नावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. संघटना अध्यक्ष ललित चौधरी, उपाध्यक्ष चंद्रशेखर दळवी आणि संपर्कप्रमुख अंकुश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र झाले.
आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली असून, जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने आंदोलनस्थळी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. ललित चौधरी, चंद्रशेखर दळवी आणि अंकुश चौधरी यांना ताप, खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. पथकाने त्यांना औषधोपचार दिले असून, त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.