ठळक मुद्दे
बुधवार (दि.13) रोजी बिऱ्हाड आंदोलनाचा 36 वा दिवस
रोजंदारी कर्मचार्यांचा संयम अखेर सुटला
पदावर काम करीत असतांना अचानक काढून टाकण्यात आल्याने केलं आंदोलन
36th day of the Birhad agitation
नाशिक : बाह्यस्त्रोत रद्द करा या मागणीसाठी गत 35 दिवसांपासून आदिवासी विकास विभागासमोर आंदोलनास बसलेल्या रोजंदारी कर्मचार्यांचा संयम अखेर सुटल्याने आंदोलनकर्त्यांनी पोलीसांना न जुमानता गेटवरुन उड्या मारत आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केला. आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलीसांचा नाईलाज झाला. आंदोलनकर्त्यांनी आज सायंकाळी 5 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमध्ये रोजंदारी वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी गत 3 ते 5 वर्षांपासून शिक्षक आणि कामाठी या पदावर काम करीत असतांना त्यांना अचानक काढून टाकण्यात आले आहे. प्रशासनाकडून खासगी कंपनीकडून भरती करण्यात येणार्या कर्मचार्यांना त्यांच्या पदावर संधी देण्यात आली आहे. याला आंदोलनकर्त्या रोजंदारी कर्मचार्यांचा विरोध आहे. बाह्यस्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी रोजंदारी कर्मचारी 9 जूनपासून आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन करीत आहे. 35 दिवसानंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर मंगळवारी (दि.13) सायंकाळी 4 च्या दरम्यान आंदोलकांनी गेटसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन सुरु केले.
लढेंगे, जीतेंगे, होश मे आवो होश मे आवो, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वातावरण तापल्याने पोलीसांनी गेटवर मानवीसाखळी करुन आंदोलनकर्त्यांना अडविले. मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी गेट तोडून पोलीसांचा विरोध पत्करत आत घुसण्याचा प्रयत्न केला.
पोलीसांनी अथक प्रयत्नांद्वारे आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलीसांचा नाईलाज झाला. पाचवाजेच्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्तालयात प्रवेश करीत आवारात ठाण मांडले. सद्यस्थितीत आंदोलनकर्त्यांनी आवारात ठाण मांडले असून घोषणाबाजी सुरु आहे.
आंदोलनकर्त्यांनी आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम दिला असून 5 वाजेपर्यंत न्याय द्या अन्यथा इमारतीत घूसून आयुक्तांच्या केबीनसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. दरम्यान पोलीस प्रशासन सतर्क असून आंदोलनकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची हरकत करु नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सावध पवित्रा घेतला आहे.