नाशिक : सातपूर येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांना नेपाळ सीमेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर ५ डिसेंबरला त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले.
या प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याने त्यांची अटक महत्त्वाची मानली जात होती. दीर्घ काळापासून फरार असलेल्या या आरोपींना ताब्यात घेण्यात नाशिक पोलिसांना यश मिळाल्याने ही कारवाई मोठे यश ठरले आहे. गुन्हे शाखा युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान हिरे आणि त्यांच्या पथक २० दिवसांपासून या दोघांच्या मागावर होते.
यापूर्वी नाशिक पोलिसांनी या आरोपींना दोनदा पकडण्याचा प्रयत्न केला. बागपत (उ. प्रदेश) व राजस्थान येथे पोलिसांना चकवा देत आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यावेळी राहुल गायकवाड व वेदांत चाळगे यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत राहुल गायकवाडचा उडी मारताना पाय फ्रॅक्चर झाला होता. ऑक्टोबरमध्ये गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकास लोंढे, सिग, गायकवाड व चाळगे एका खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांची चाहूल लागताच प्रिन्स सिंग फरार झाला. भूषण लोंढेही हरियाणात पळून गेल्याचा संशय होता. दोघेही नेपाळ सीमेवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले.