जळगाव: भुसावळ शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये रविवारी पहाटे 4.30 ते 4.32 या अवघ्या दोन मिनिटांच्या आत अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून 5 लाख रुपयांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चोरीनंतर चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत बस स्थानकाच्या दिशेने धाव घेत रेल्वे स्टेशन गाठले आणि पहाटे 4.44 वाजता खांडव्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीने ते पसार झाले. या घटनेमुळे शहरातील नाईट पेट्रोलिंग आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहर बाजारपेठेतील 'कस्तुरी मेन्स वेअर आणि साड्या' तसेच 'शुभम इलेक्ट्रॉनिक्स' या दोन मुख्य व्यापाऱ्यांची दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी शटर वाकून आत प्रवेश केला.
कस्तुरी मेन्स वेअर या दुकानाच्या शेजारी आयडीबीआय (IDBI) बँक असूनही चोरट्यांनी तिथे चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी शुभम इलेक्ट्रॉनिक्सचे शटर वाकवून दोन मिनिटांमध्ये ५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरीचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस येताच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमध्ये तीन चोरटे चोरी करताना आणि त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना कैद झाले आहेत.
अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी चोरीचा गुन्हा करून रेल्वे स्टेशन गाठले आणि खांडव्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसून ते पसार झाल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. महत्त्वाच्या बाजारपेठेत आणि रेल्वे स्थानकाजवळ अशी घटना घडल्याने शहरातील रात्रीच्या पोलीस गस्तीवर टीका होत आहे.
याच भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाच्या वाहन चालकाने ₹25 लाखांचा दरोडा टाकला होता, त्यावेळी एलसीबीच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, ती घटना ताजी असतानाच 48 तास उलटत नाहीत तोच ही दुसरी मोठी चोरी उघडकीस आली आहे.
यामुळे 'चोरटे येतात काय, हात साफ करून जातात काय' अशी परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. चोरीचे स्वरूप आणि चोरट्यांचा पसार होण्याचा मार्ग पाहता, पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.