

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील महिला सरपंचाने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितली. तपासणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला सरपंचाला ताब्यात घेत मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार शासकीय कंत्राटदार आहे. संबंधित कंत्राटदाराने नवरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम केले. केलेल्या कामाचे बिलाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी आरोपी सरपंच सुचिता फुलू कुमरे यांनी कंत्राटदाराकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार संबंधित कंत्राटदाराने लाचलुचपत विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचून १४ ऑक्टोबरला पडताळणी कार्यवाहीदरम्यान सरपंच सुचिता कुमरे यांनी बिलाच्या धनादेशावर सही करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी सुचिता कुमरे यांना ताब्यात घेऊन मारेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही कारवाई यवतमाळ एसीबीने केली.