नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदूबाबा अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे. शिर्डी येथील भूखंड बळकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत ९ मे रोजी संपल्यानंतर राहाता न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून शिर्डी पोलिसांनी सायंकाळी उशिरा त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणले.
कारागृहात दाखल करताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. न्यायालय परिसरातही मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशोक खरातविरोधात नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे येथे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी शिर्डी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
भूखंड बळकावल्याच्या प्रकरणात सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, समता पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल आहे. या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात आणखी काही महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता असल्याने तपास पूर्ण झाल्यानंतर शिर्डी पोलिस पुन्हा त्याचा ताबा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समता पतसंस्थेतील व्यवहारांची कागदपत्रे, बँक व्यवहार आणि संबंधित खातेदारांची चौकशी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळत आहे. अशोक खरात हा १८ मार्चपासून विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर गंभीर आरोप आहेत.
भूखंड बळकावल्याच्या प्रकरणात त्याची पत्नीही संशयित आरोपी असून, ती गेल्या महिनाभरापासून फरार आहे. अटकेपासून बचावासाठी तिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू असून, विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आल्याचे समजते.