Ashok Kharat pudhari photo
नाशिक

Ashok Kharat Fraud Case | 'सिद्ध खड्या'च्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूक! भोंदू बाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

Ashok Kharat Fraud Case | पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी न केल्याने न्या. एस. पी. बाबर यांनी खरात यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

व्यापाऱ्याला व्यापारवृद्धीचे आमिष दाखवून बनावट खड्याची अंगठी देत आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात भोंदू अशोक खरात यास सोमवारी (दि. ५) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी न केल्याने न्या. एस. पी. बाबर यांनी खरात यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

नेवासा येथील कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांना व्यवसायात मोठी वाढ होईल, असे आमिष दाखवून खरातने त्यांच्याकडून सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे अडीच लाख रुपये रोख घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर खरातने भागवत यांना 'सिद्ध खडा' असल्याचे सांगत एक अंगठी दिली.

मात्र, तपासणी केल्यानंतर अंगठीतील खडा बनावट असून, ती धातूची असल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भागवत यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात खरातला यापूर्वी दोन वेळा पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यातील पाच दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. तपास पथकाकडून यावेळी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली नाही.

मागील दोन्ही पोलिस कोठडीत आरोपीची आवश्यक चौकशी पूर्ण झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक व अत्याचाराचे दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अन्य प्रकरणांमध्ये तो यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत असल्याने या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT