कलवण : पुढारी वृत्तसेवा
मंत्र-तंत्र व पूजाविधी करून १५ कोटी रुपयांचा 'पैशांचा पाऊस' पाडण्याचे आमिष दाखवत मुंबईतील काही कुटुंबांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण तालुक्यातील पिंपळे (खुर्द) येथील भोंदूबाबासह सहा जणांविरुद्ध अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भोंदू हिराचंद शिवाजी बर्डे याच्यासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता भोंदूबाबासह दोघांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील बोरिवली येथील राजाराम सीताराम शेलार यांना त्यांच्या मित्रांमार्फत हिराचंद बर्डे याची ओळख झाली. पूजाविधी करून पैशांचा पाऊस पाडता येतो, असा दावा त्याने केला.
सुरुवातीला पाच जणांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतल्यानंतर त्याने पूजा करून दोन लाख रुपये झाल्याचे भासवले. हा प्रकार पाहून पीडितांचा त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर पाच जणांनी ११ लाख रुपये दिल्यास १५ कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार भोंदूबाबाने रोख व ऑनलाइन पद्धतीने तब्बल १० लाख ९५ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.
पूजाविधीदरम्यान नारळातून स्फोट घडवून चमत्काराचा आभास निर्माण करण्यात आला. त्यानंतर तीन कोटी रुपयांचा 'पैशांचा पाऊस' पडल्याचे सांगत नोटांनी भरलेली गोणी पीडितांच्या ताब्यात देण्यात आली. गोणी सात दिवस उघडू नये, अन्यथा देवाचा कोप होईल, अशी भीती दाखवण्यात आली.
मात्र, काही दिवसांनी संशय आल्याने पीडितांनी गोणी उघडली असता बंडलांमध्ये केवळ वरच्या नोटा खऱ्या असून, आतील नोटा खेळण्यांमधील बनावट असल्याचे आढळले. यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. डॉ. टी. आर. गोराणे व कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने अभोणा पोलिसांत तक्रार आली. प्रभारी पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जादूटोणाविरोधी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.