Ashok Kharat case file photo
नाशिक

Ashok Kharat Scam | देवदर्शनाच्या नावाखाली उघडली भक्तांची बनावट खाती

Ashok Kharat Scam | भोंदू अशोक खरातचा नवा घोटाळा उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, देवदर्शनाच्या नावाखाली भक्तांकडून कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अशोक खरात भक्तांना धार्मिक स्थळांच्या भेटी, देवदर्शन किंवा धार्मिक पर्यटनासाठी केवायसी आवश्यक असल्याचे सांगत असे. त्यानुसार तो आधारकार्ड, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेत असे.

ही कागदपत्रे मिळाल्यानंतर तो संबंधितांच्या नावावर विविध पतसंस्थांमध्ये बनावट खाती उघडत असे. विशेष म्हणजे या खात्यांमध्ये तो स्वतःलाच 'नॉमिनी' म्हणून नोंदवत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उभे करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

समता पतसंस्थेमध्ये तब्बल १३७बनावट खाती उघडल्याच्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाती उघडूनही संस्थेच्या व्यवस्थापनाच्या व संचालक मंडळाच्या हे कसे लक्षात आले नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, खरात याच्याकडे येणारा भक्तवर्ग पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे तो सांगेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवून लोकांनी आपली कागदपत्रे दिली. या विश्वासाचा गैरफायदा घेत खरातने आर्थिक फसवणुकीचा मोठा डाव साधल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT