Ashok Kharat Nashik Case Pudhari
नाशिक

Nashik Ashok Kharat Case | मुलांना ठार मारण्याची धमकी अन् वारंवार अत्याचार! नराधम अशोक खरातविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Nashik Ashok Kharat Case | अंनिसने व्यक्त केला संशय : जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी खरातच्या संपर्कात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दैवी शक्ती आणि धार्मिक विधींचा आधार घेत महिलेची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संबंधित महिलेने पोलिसांत अशोक खरातविरोधात फिर्याद दाखल केली आहे. ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत चार वेळा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.

दाखल फिर्यादीनुसार, पीडिता ही पती, मुलगा व मुलीसह राहात असून, पतीच्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तिचा विवाह २५ मे २०१३ रोजी झाला असून, तिला २०१४ मध्ये मुलगी झाली. कौटुंबिक वादांमुळे काही काळ पती-पत्नी वेगळे राहात होते. मात्र, २०२२ मध्ये नातेवाइकांच्या माध्यमातून त्यांची ओळख मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेव मंदिराशी संबंधित असलेल्या अशोक खरातशी झाली.

त्याने दोघांना समजावून सांगत पुन्हा एकत्र राहण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास निर्माण झाला. यानंतर संबंधित दाम्पत्याने कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या 'ओक्स प्रॉपर्टीज' कार्यालयात अनेक वेळा भेटी दिल्या. खरात हा जन्मतारीख व इतर माहितीच्या आधारे भविष्य सांगत असल्याचा भास निर्माण करून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सल्ला देत असे. या भेटीदरम्यान त्याने प्रसाद म्हणून नारळपाणी व इतर पेय दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये महिलेचा पती बाहेर गेल्यानंतर खरातने तिला एकटीला बोलावून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास दिले. त्यानंतर धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्यावर मंत्रोच्चार करून, डोक्यावर हात ठेवून व जवळ घेत गैरवर्तन केले. त्यानंतर स्वतःला 'महादेवाचा अवतार' असल्याचे सांगत तिच्यावर जबरदस्ती केली होती.

तिने विरोध केल्यास तिच्या मुलांना ठार मारण्याची व आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या भीतीपोटी संबंधित महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पुढील काही महिन्यांत ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान अशाच प्रकारे चार वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरवेळी तिला गुंगीकारक पदार्थ दिल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. अलीकडेच इतर महिलांनीही अशोक खरातवर अत्याचाराचे आरोप करीत तक्रारी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित महिलेने धैर्य एकवटत आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला. पतीच्या पाठिंब्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेत औपचारिक फिर्याद नोंदवली आहे.

हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, दैवी शक्ती व अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांची फसवणूक व शारीरिक शोषण केल्याचा आरोप असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपीविरोधात बलात्कार, धमकी व फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT