Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | शब्दांचे मायाजाल अन् क्रूर वास्तव! भोंदू अशोक खरातने इंग्रजी आणि संवादशैलीच्या जोरावर कसं विणलं जाळं?

Ashok Kharat Case | एखाद्या व्यक्तीचे संवादकौशल्य, सादरीकरणामुळे अनेक जण भाळतात. याचाच फायदा उचलत इतरांवर प्रभाव टाकून भोंदू खरातने महिलांचे लैंगिक शोषण केले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखील रोकडे

एखाद्या व्यक्तीचे संवादकौशल्य, सादरीकरणामुळे अनेक जण भाळतात. याचाच फायदा उचलत इतरांवर प्रभाव टाकून भोंदू खरातने महिलांचे लैंगिक शोषण केले. त्याचबरोबर अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

स्वतःभोवती आध्यात्मिक गुरूचे वलय तयार करणाऱ्या भोंद अशोक खरातच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण पैलू तपासात उघडकीस आला आहे. शब्दांची जादू, इंग्रजीची धार आणि देहबोलीतील आत्मविश्वास यांचा संगम साधत त्याने असे मायाजाल विणले की, पोलिस व तपास यंत्रणांचे अनुभवी अधिकारीही त्याच्या संवादशैलीने क्षणभर चक्रावून गेले.

चौकशीदरम्यान त्याची अचूक शब्दफेक, प्रभावी इंग्रजी आणि समोरच्याला भुरळ घालणारी देहबोली ही जणू रंगभूमीवरील कलाकाराचीच आठवण करून देणारी ठरली. त्याच्या आवाजातील चढ-उतार, नजरेतील ठामपणा आणि संवादातील नेमकेपणा यामुळे तो समोरच्याच्या मनात विश्वास निर्माण करत असे. काही वेळा तो मुद्दाम गुंतागुंतीची शब्दरचना वापरत असे, ज्यामुळे तो अधिक विद्वान आणि प्रभावी वाटत असे.

घरच्या चार भिंतींतही अस्खलित इंग्रजीचा सहज वावर ठेवणारा खरात, बोलण्यातली धार, ठामपणा आणि शब्दांची मोहिनी यामुळे समोरच्याच्या मनावर नकळत अधिराज्य गाजवत असे. त्याचा प्रत्येक शब्द जणू विश्वासाचा पाया रचत होता, तर प्रत्येक हालचाल समोरच्याला आपल्याकडे खेचत होती.

त्यामुळेच उच्चभ्रू, सुशिक्षित तसेच राजकीय व शासकीय क्षेत्रातील मान्यवरही त्याच्या प्रभावाखाली आले, हे तपासात स्पष्ट झाले आहे. अनेक वेळा तो समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखून त्यानुसार भाषेचा टोन बदलत असे. त्यामुळे विश्वास अधिकच दृढ होत गेला. त्याच्या संवादात आश्वासने, आध्यात्मिकतेचे आभास आणि वैयक्तिक समस्यांवर उपाय सुचवण्याची शैली यांचा संगम असे. मात्र, या आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आड दडलेल्या क्रूर व्यक्तिमत्त्वाचा बुरखा अखेर फाटला आणि फसवणूक आणि महिला लैंगिक शोषणाचे १६ गुन्हे त्याच्यावर दाखल झाले.

१८ मार्चपासून तो विविध गुन्ह्यांमध्ये पोलिस कोठडीत आहे. सध्या तो शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने फसवणुकीच्या माध्यमातून उभारलेले आर्थिक साम्राज्यही तपासात उघड झाले आहे. काही व्यवहार परदेशी खात्यांमार्फत झाले काय, याचा शोध घेतला जात आहे. पीडित व्यक्तींच्या जबाबांमधून फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे.

दुनिया झुकती है...

विविध देशांतील प्रवासातून आत्मसात केलेली देहबोली आणि वर्तनशैली यांचा वापर करत खरातने विश्वासार्हतेचा मुखवटा अधिकच भक्कम केला. त्याच्या संवादकौशल्यानेच या बेकायदेशीर साम्राज्याला आकार दिला, हे स्पष्ट होत आहे. त्याने स्वतःभोवती निर्माण केलेली प्रतिमा इतकी प्रभावी होती की, संशयाची किनारही अनेकांना जाणवली नाही. या संपूर्ण प्रकरणातून एक बाब प्रकर्षान पुढे येते शब्दांची चमक, व्यक्तिमत्त्वाची झळाळी आणि आत्मविश्वास यामागे दडलेली फसवणूक किती भयंकर असू शकते, याचे हे उदाहरण होय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT