Kalpana Kharat Bail Hearing Pudhari
नाशिक

Kalpana Kharat Nashik | दीड महिना उलटला तरी कल्पना खरात फरारच

Kalpana Kharat Nashik | शिर्डी येथे दाखल गुन्ह्यात कल्पना खरात हिचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक फसवणूक व बेनामी संपत्ती प्रकरणात आरोपी असलेली पत्नी कल्पना खरात ही अद्यापही फरार असून, गुन्हा दाखल होऊन जवळपास दीड महिना उलटल्यानंतरही ती पोलिसांच्या हाती लागू न शकल्याने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शिर्डी येथे दाखल गुन्ह्यात कल्पना खरात हिचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, इतका मोठा कालावधी उलटूनही आरोपीला अटक करण्यात यश न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

भोंदू अशोक खरात याच्याविरोधात महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, धार्मिक अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक तसेच बेनामी मालमत्ता प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. तपासादरम्यान अशोक खरातच्या कथित बेनामी संपत्तीत कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचे तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. यानंतर शिर्डी येथे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही ती तपास यंत्रणांना चकवा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कल्पना खरात ही दुसऱ्या राज्यात आश्रय घेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिच्या हालचालींबाबत काही महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचीही चर्चा आहे. पोलिस पथकांकडून विविध राज्यांत शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. मात्र, अधिकृत पातळीवर याबाबत मौन बाळगण्यात आले आहे.

अशोक खरात हा १८ मार्चपासून पोलिस कोठडीत आहे. सुमारे ६० दिवसांनंतर त्याचा ताबा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतला आहे. दुसरीकडे, उद्योजक तथा शिवलिका संस्थानचा पदाधिकारी नामकर्ण आवारे यालाही अटक होऊन न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष म्हणजे, कल्पना खरात विरोधातील गुन्हा सर्वप्रथम दाखल होऊनही ती अद्याप पोलिसांच्या रडारबाहेर असल्याने या प्रकरणात कारवाई कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT