पिंपळगाव बसवंत नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त नागरिक व युवकांनी 'भीक मागो' आंदोलन छेडले. Pudhari News Network
नाशिक

Bhik Mango Andolan | पिंपळगावी विकासासाठी भीक मांगो आंदोलन

नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : पिंपळगाव बसवंत नगरपरिषद स्थापन होऊन बराच काळ झाला असला तरीही शहरातील नागरिकांना पाणी, स्वच्छता, गटारींची सफाई, पथदिवे, घरकुल योजना यांसारख्या मुलभूत सुविधांचा अभाव भोगावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त नागरिक व युवकांनी 'भीक मागो' आंदोलन छेडले.

या आंदोलनात आदिवासी उलगुलान सेना, महात्मा रावण किंग फाउंडेशन आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. संतोष सुरडकर व दत्तू झनकर यांनी भिकाऱ्याच्या वेशात फाटके कपडे, काळं रंगवलेलं तोंड, विस्कटलेले केस, चप्पलविना पाय आणि हातात वाटी घेत ‘पिंपळगावच्या विकासासाठी भीक मागतोय’ अशा घोषणा देत लोकांकडून अक्षरशः भीक मागितली.

हे आंदोलन निफाड फाटा येथून सुरू होऊन मेन रोड, जुना आग्रा रोड मार्गे नगरपरिषद कार्यालयापर्यंत पोहोचले. जमा झालेली रक्कम नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. मात्र, प्रशासनाने रक्कम न स्वीकारता फक्त लेखी आश्वासन दिले. यावर आंदोलकांनी नगरपरिषद कार्यालयात ठिय्या दिला. अखेर, आरोग्य विभाग प्रमुख राकेश देशमुख यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी दत्तू झनकर, संतोष सुरडकर, संतोष बोरसे, योगेश पवार, विष्णू गांगुर्डे, फारूक शेख, संदीप ठाकरे, राहुल गांगुर्डे, सागर ठाकरे, हरी भोये, पिंटू पवार, सागर पिठे, वसंत वाघ आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

  • रखडलेली विकासकामे तात्काळ सुरू करावीत.

  • नगरपरिषदेतील अधिकारी लोकाभिमुख व जबाबदार असावेत.

  • पाणी, गटार, वीज, रस्ते या मुलभूत गरजांकडे तातडीने लक्ष द्यावं.

  • मंजूर निधी कुठे गेला याची चौकशी करावी व याबाबत जनतेसमोर स्पष्टता करावी.

  • किमान वेतनापासून वंचित असलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.

प्रशासनाला चार दिवसांची अंतिम मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरून 'भीक मागो' आंदोलन केलं. आता तरी प्रशासनाने गांभीर्य लक्षात घ्यावे अन्यथा याहून उग्र आंदोलन केले जाईल.
संतोष सुरडकर, नागरिक, पिंपळगाव बसवंत
हे आंदोलन निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आहे. जनतेच्या असंतोषाचा आणि त्यांच्या हक्काच्या मागण्यांचा आवाज आहे. आम्ही गोळा केलेली रक्कम पोस्टाने नगरपरिषदेकडे पाठवणार आहोत.
दत्तू झनकर, नागरिक, पिंपळगाव बसवंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT