भगूर नगर परिषदेच्या लता थापेकर व अजय वहाने यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, कायदेशीर बाबींची पडताळणी होऊन याबाबत कार्यवाही केली जाणार असल्यामुळे भगूरमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. या दोघांशिवाय आणखी ४ ते ५ नगरसेवकांच्या पदावर गंडांतर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजप व शिवसेना उबाठा गटाने नगराध्यक्षासह २० पैकी ११ जागांवर विजय प्राप्त केला, तर शिवसेना (शिंदे गटाने) ८ जागा जिंकल्या.
एक जागा अपक्ष वंचित बहुजन आघाडीने जिंकली. प्रभाग आठमधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लता थापेकर यांच्याविरुद्ध माजी सैनिक दीपक इंगळे यांनी अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी भगूर नगर परिषदेला ९ जूनला लता थापेकर यांचे अनधिकृत अतिक्रमण काढण्याचे तसेच कार्यवाहीचा अहवाल देण्याचा आदेश दिला होता.
मात्र तशी कोणतीही कार्यवाही कार्यालयाकडून झाली नसल्याने २४ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगर परिषदेला थापेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत पत्र प्राप्त झाले. याबाबत भगूर नगर परिषद प्रशासनानेदेखील दुजोरा दिला असून, मुख्याधिकारी सध्या सुट्टीवर असल्याने पुढील कार्यवाही त्यांच्या आदेशानुसार केली जाईल, असे सांगितले.
प्रभाग दहामधील एससी या नगर परिषद सुरखागतम राखीव जागेवर निवडून आलेले अपक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अजय वहाने यांच्या जातप्रमाणपत्राला प्रतिस्पर्धी उमेदवार भारती साळवे व शरद उबाळे यांनी हरकत घेत जातपडताळणी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.
वेळोवेळी झालेल्या सुनावणीनुसार जातपडताळणी समितीने वहाने यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याचा निर्णय २४ जूनला दिला. त्यांना जातप्रमाणपत्र शासनदरबारी जमा करण्याचे आदेश दिले असून, समितीचा निर्णय मान्य नसल्यास उच्च न्यायालयात जाण्याबाबत सूचना केली आहे. अजय वहाने यांना याबाबत वारंवार फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
अफवांवर विश्वास ठेवू नये माझे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार, खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णय क्र. जमीन-२०२६/प्र.क्र.२०/जमीन-२ नुसार शासकीय जमिनीवरील ०१/०१/२०११ पर्यंतच्या निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार भगूर शहरातील व माझ्या प्रभागातील पात्र नागरिकांची घरे नियमित होऊन त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेची मालकी मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. काही व्यक्ती वैयक्तिक वादातून तसेच राजकीय हेतूने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी कायद्याच्या चौकटीत नागरिकांच्या हितासाठी व हक्कांसाठी काम करत राहणार आहे. लता थापेकर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती