Bhagat Singh Koshyari Nashik 
नाशिक

Maharashtra Politics | "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा मनसे प्रमुखांना टोला

Maharashtra Politics | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर टीकास्त्र डागणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डिवचले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर टीकास्त्र डागणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डिवचले आहे. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो.

मात्र मला वाटतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, असा सल्ला देताना 'जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींनादेखील सर्व समान आहेत', अशा शब्दांत कोश्यारी यांनी प्रभू श्रीरामांशी पंतप्रधान मोदींची तुलना केली आहे.

'नरेंद्र मोदींना घाबरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही आहात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा', असा टोलाही कोश्यारी यांनी लगावला आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी माजी राज्यपाल कोश्यारी बुधवारी (दि.११) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राज ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यातील वादावर भाष्य केले.

रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांवर राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून टीका केली होती. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका, असे ठाकरे यांनी त्यांना सुनावले होते. त्यावर कोश्यारी यांनी पलटवार केला आहे.

जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी उपरोधिक टीका कोश्यारी यांनी केली. ४० वर्षांपूर्वी देखील मी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

मी देखील आज एक भक्त म्हणून आलो आहे. राज्यपाल असताना देखील मी नाशिकमध्ये आलो होतो, अशी आठवणही कोश्यारी यांनी यावेळी सांगितली. अयोध्येच्या धर्तीवर नाशिकमध्येही कॉरिडॉर व्हावा, अशी इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली.

रोहित पवारांनी चौकशीची मागणी करावी !

अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर शंभर टक्के घातपात झाल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे. त्यावरही कोश्यारी यांनी भाष्य केले. रोहित पवार यांना घातपाताबाबत वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असे सूचित करताना अजित पवार एक मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर अनेकदा टीका झाली. मला दुषणे देण्यात आली, पण अजितदादांनी माझ्यावर कधीच टीका केली नाही. माझ्या कधीही ते विरोधात बोलले नाहीत. मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही, असे कोश्यारी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT