पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
बीएच सिरिजची वाहने वापरणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या वाहनाचा थकीत मोटार वाहन कर विहित मुदतीत न भरल्यास दररोज १०० रुपये विलंब शुल्क आकारला जाणार असल्याचा इशारा नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ च्या राजपत्राद्वारे बीएच सिरिजच्या नोंदणीची सुविधा सुरू केली होती. ही सुविधा केंद्रीय कर्मचारी, अधिकारी तसेच चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नियमानुसार बीएच सिरिजच्या वाहनांना दर दोन वर्षांनी मोटार वाहन कर भरणे बंधनकारक असते. मात्र, नाशिक विभागातील अनेक वाहनधारकांनी दोन वर्षांची मुदत संपूनही पुढील टप्प्यातील कर भरलेला नसल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली असून, कर भरण्यास विलंब झाल्यास मूळ कराच्या रक्कमेसह मुदत संपल्यापासून दररोज १०० रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे.
"अनावश्यक दंड आणि कायदेशीर कारवाईचा बडगा टाळण्यासाठी वाहनधारकांनी आपल्या बीएच सिरिज वाहनाचा थकीत कर parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तत्काळ ऑनलाइन पद्धतीने भरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे."महेश देशमुख, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक