Konkan cyclone alert Pudhari
नाशिक

Akvan Cyclone News | बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाचे संकेत

Akvan Cyclone News | बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाचे संकेत; महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

बंगालच्या उपसागरात मान्सूनोत्तर हंगामातील तिसरी हवामान प्रणाली सक्रिय झाली असून, तिथे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यास या संभाव्य चक्रीवादळाला 'अक्वान' हे नाव दिले जाणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, हवामानशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

चक्रीवादळ निर्मितीची प्रक्रिया विविध टप्प्यांतून पूर्ण होते. कमी दाबाचे क्षेत्र, अधिक संघटित कमी दाबाचे क्षेत्र, अवदाब, तीव्र अवदाब आणि त्यानंतर चक्रीवादळ अशी या प्रक्रियेची टप्पे आहेत. १४ नोव्हेंबरच्या निरीक्षणानुसार, सध्या ही प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्राच्या अवस्थेत आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत तिथे अवदाबात, तर १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत.

समुद्रपृष्ठाचे तापमान, समुद्रातील उष्णतेचा साठा, वातावरणातील आर्द्रता आणि दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या वेगात व दिशेतील बदल या घटकांवर प्रणालीची तीव्रता अवलंबून असेल, ज्यामुळे १७ ते १९ नोव्हेंबर हा कालावधी चक्रीवादळाची दिशा आणि संभाव्य तीव्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

बंगालच्या उपसागरातील या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणवरही होण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

परिणामी, सध्या जाणवणाऱ्या थंडीत काही काळासाठी घट होऊन तापमानात चढ-उतार होऊ शकतात, असे डॉ. जोहरे यांनी स्पष्ट केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

इराणकडून 'अक्वान' नावाची शिफारस

संभाव्य चक्रीवादळासाठी 'अक्वान' हे नाव इराणने सुचवले आहे. पर्शियन महाकाव्य 'शाहनामा'मधील अक्वान-ए-दीव या पौराणिक पात्राशी या नावाचा संबंध जोडलेला आहे. मात्र, आवश्यक वाऱ्याचा वेग प्राप्त होऊन अधिकृत निकष पूर्ण झाल्यानंतरच या प्रणालीला चक्रीवादळाचा दर्जा मिळणार आहे. यापूर्वीच्या 'अर्णब' आणि 'मुरासु' या हवामान प्रणालीनंतर आता संभाव्य 'अक्वान'ची निर्मिती होत असल्याने उत्तर-मानसून काळातील हवामानातील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाशिक १३.४; निफाडमध्ये ११.५ अंश तापमानाची नोंद

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने कमाल तापमानात घट होऊ लागली असून, नाशिक जिल्ह्यात गारठा वाढू लागला आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असून, शनिवारी (दि. १४) नाशिक शहराचे किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस, तर निफाडचे तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

पहाटेच्या वेळी हवेत गारवा अधिक जाणवत असून, नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. निफाडमध्ये पारा ११.५ अंशांपर्यंत खाली आल्याने ग्रामीण भागात हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, किमान तापमानात घसरण होत असतानाच कमाल तापमान ३१.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा, तर दुपारी उन्हाची तीव्रता असे परस्परविरोधी हवामान अनुभवायला मिळत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठ्या तफावतीमुळे वातावरणात बदल जाणवत आहे. आगामी काळात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव राहिल्यास किमान तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT