नाशिक : सोशल मीडियावरून जुळलेल्या प्रेमसंबंधानंतर बांगलादेशमधून बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिकमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेसह तिच्या मुलीचा शोध शहर पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) घेतला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बांगलादेशी महिलेसह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरैया अक्तर ऊर्फ श्रेया केदारे (२८, रा. गोविंदनगर, मूळ रा. जेस्सोर, बांगलादेश) व गोविंद नंदू केदारे (रा. गोविंदनगर, मूळ रा. लासलगाव) अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत. सुरैया हिने नदीमार्गे पाच ते सहा वेळा अनधिकृतरीत्या बांगलादेशातून भारतात प्रवेश केला असून, त्यासाठी तिने अनुक्रमे पाच, आठ, दहा, बारा व अठरा हजार खर्च केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेने मंगळवारी मुंबईनाका येथील गोविंदनगर येथे कारवाई करीत एका दाम्पत्यास ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीस महिलेने 'श्रेया गोविंद केदारे', असे नाव सांगितले. मात्र, त्यानंतर तिने 'सुरैया अक्तर मोहम्मद इमामुल हसन' असे खरे नाव सांगत ती बांगलादेशची रहिवासी असल्याची कबुली दिली. सन २०१७ मध्येही सुरैया ही अवैधरीत्या भारतात आली होती. त्यावेळी फेसबुकवरून गोविंदसोबत तिची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेम व त्यानंतर विवाहात झाले. पोलिसांनी दोघांकडून १ लाख ५ हजार रुपयांचे तीन मोबाइल जप्त केले आहेत. तसेच श्रेया केदारे नावाने आधारकार्ड, गोविंदने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे प्रतिज्ञापत्र, मुलगी आलियाचा कोलकाता येथून बनवलेला बनावट भारतीय जन्म दाखला, सुरैयाकडून बांगलादेशातील 'निकाहनामा' असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, सुरैयाचे मामा-मामी देखील अवैधरीत्या भारतात आल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी दोघांनाही बुधवारी (दि.११) पुणे येथील शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले आहे. गोविंद केदारे व सुरैया यांना न्यायालयाने शुक्रवार (दि.१३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुरैयाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पाच ते १८ हजार रुपयांपर्यंत खर्च करून बांगलादेशमधील नदीमार्गे छोट्या बोटीने भारतातील कोलकाता येथे उतरत, त्यानंतर काेलकाता येथून रेल्वेमार्गे, मुंबई, नाशिक असा प्रवास केला. तसेच भारतातील शासकीय कागदपत्रे तयार करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही सुरैयाने सांगितले. २०२२ मध्येही सुरैयाने एजंटला पैसे देत मुलीसह बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केला होता. तर गोविंद हा पत्नी सुरैयाला भेटण्यासाठी आठ वेळा वैध मार्गाने बांगलादेशला गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.