

नाशिक : सोशल मीडियावरील ओळखीनंतर नाशिकचा तरुण व बांगलादेशी तरुणीने दोन देशांच्या सीमा ओलांडून प्रेमविवाह करीत नाशिकमध्ये संसार थाटल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीने बांगलादेशमधून चोरीछुप्या पद्धतीने भारतात प्रवेश करीत आधारकार्डसह इतर बनावटे कागदपत्रे बनवल्याचे समोर येत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत महिलेने मतदानही केल्याचे समजते. याप्रकरणी मंगळवारी (दि. १०) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गुन्हे शाखेने बांगलादेशी महिलेसह तिच्या पतीस ताब्यात घेतले आहे.
पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीद्वारे मंगळवारी ही कारवाई केली. दोघांच्याही कागदपत्रांची पडताळणी करून चौकशी केली असता पोलिस तपासात तरुणीचे शिक्षण बांगलादेशात झाले असले, तरी तिच्याकडे कोलकातामधील एका शाळेचा दाखला असून, तो संशयास्पद आहे. तसेच विवाहितेने 'गॅझेटिअर'द्वारे नावात बदल करून भारतात आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान कार्ड काढल्याचेही समजते. त्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा संशय असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये नाशिकच्या तरुणाची बांगलादेशी तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली. तरुणास भेटण्यासाठी तरुणी बेकायदेशीररीत्या बांगलादेशमधून मुंबईत पोहोचली. तेथे दोघांमध्ये भेटीगाठी व शरीरसंबंध झाले. त्यानंतर तरुणी पुन्हा बांगलादेशला गेली. गरोदर असल्याचे समजल्यावर तिने नाशिकच्या तरुणाला कळवले. काही महिन्यांनी पासपोर्ट व व्हिसाद्वारे तरुण बांगलादेशात पोहोचला. मात्र, तरुणी मुस्लीम व तरुण हिंदू असल्याने बांगलादेशात दोघांच्या विवाहाला तीव्र विरोध झाल्याने तो भारतात परतला. त्यानंतर तरुणीने एका मुलीस जन्म दिला. त्यानंतर पासपोर्ट व व्हिसाद्वारे तिने भारतात प्रवेश केला. अंदाजे २०१९ पासून २०२२ पर्यंत दोघेही भारतात एकत्र राहिल्याचे कळते. त्यानंतर दोघेही बांगलादेशात गेले व तरुणाने धर्म बदलून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर पुन्हा दोघे भारतात आले व नाशिकमध्ये स्थायिक झाल्याचे समजते. तरुणीने वारंवार गैरमार्गाने भारतात प्रवेश केला असून, तिने भारतात एकदा पासपोर्ट फाडल्याचेही कळते. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करीत आहेत.