शबरी नॅचरल्स या प्रीमियम ब्रँड अंतर्गत वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेने तयार केल्या बांबू राखी
अल्पावधीतच देशविदेशात लोकप्रियता : बांबूच्या राख्यांनी इंग्लंडच्या ग्राहकांची मने जिंकली
बांबू राख्यांना बाजारात मोठी मागणी : संकेतस्थळावरून राख्या विकत घेण्याची सुविधा उपलब्ध
नाशिक : आदिवासी बांधवांनी बनवलेल्या बांबूच्या राख्यांनी इंग्लंडच्या ग्राहकांची मने जिंकली आहेत. शबरी नॅचरल्स या प्रीमियम ब्रँड अंतर्गत वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेने तयार केलेल्या या राख्यांनी अल्पावधीतच देशविदेशात लोकप्रियता मिळवली आहे. या राख्या shabarinaturals.com या वेब पोर्टलवर उपलब्ध करताच इंग्लंडच्या काही रहिवाशांनी राख्यांची मागणी केली, त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे जतन आणि प्रचार होण्यास मदत होत आहे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्था, मु. लवादा (मेळघाट), पो. दुनी, ता. धारणी, जि. अमरावती यांना अनुदान आणि कर्ज देऊन पाठबळ दिले आहे. ही संस्था बांबूपासून आकर्षक हस्तकला उत्पादने तयार करते, ज्यामध्ये सध्या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे. शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून राख्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. धारणी येथील वेणूशिल्पी संस्थेच्या आदिवासी कारागिर बांधवांनी या बांबूच्या राख्या तयार केल्या आहेत. आदिवासी विकास भवन येथून किंवा shabarinaturals.com या संकेतस्थळावरून राख्या विकत घेण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले आहे.
हे पाच वर्षांपासून राधा राख्या, इलेक्ट्रिक माळा आणि इतर हस्तकला बनवतात. त्यांनी बनवलेल्या राखीला 'राधा राखी' असे नाव देण्यात आले आहे. त्या वेणुशिल्पी संस्थेच्या सदस्य आणि प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.राधा कृष्णा मसाने, भिल आदिवासी, मू. चित्री, ता. धारणी, जि. अमरावती.
गोरेलाल पायाने दिव्यांग असूनही 19 वर्षांपासून बांबू हस्तकलेतून आपल्या पायावर उभे आहेत. त्यांनी बनवलेली 'अंगठी राखी' लोकप्रिय आहे. त्यांची दिव्यांग पत्नी शांतीदेखील वेणुशिल्पी संस्थेत बांबूचे कार्य करते. गोरेलालगोरेलाल अहिर्या, भिलाला आदिवासी, मु. काटकुंभ, ता. धारणी, जि. अमरावती.
वेणुशिल्पी संस्थेचे कोषाध्यक्ष असलेले सोहनलाल दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. गेल्या 13 वर्षांपासून ते बांबू हस्तकलेतून नियमित उत्पन्न मिळवतात. त्यांनी बनवलेली 'मोर राखी' आणि डिझायनिंगमधील योगदान उल्लेखनीय आहे.सोहनलाल रामलाल कासदेकर : मु. घोटा, ता. धारणी, जि. अमरावती.
रामलीला यांनी आपले पती सोहनलाल यांच्याकडून बांबू हस्तकला शिकली. गेल्या 7 वर्षांपासून त्या बांबूपासून वस्तू बनवून उदरनिर्वाह करतात. त्यांनी बनवलेल्या राखीला 'रामलीला राखी' असे नाव देण्यात आले आहे.रामलीला सोहनलाल कासदेकर : मु. घोटा, ता. धारणी, जि. अमरावती.
शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून या राख्या एका क्लिकवर जगभर उपलब्ध आहेत. आदिवासी बांधवांच्या हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ सातत्याने प्रयत्न करत आहे. या राख्यांनी केवळ बाजारपेठेतच नव्हे, तर परदेशी ग्राहकांच्या मनातही स्थान मिळवले आहे.