TCS Nashik Case Pudhari
नाशिक

Nashik TCS Case | टीसीएस प्रकरणातील पाच संशयितांना जामीन मंजूर; नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Nashik TCS Case | टीसीएस प्रकरणातील पाच संशयितांना जामीन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक येथील टीसीएस प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित खरकर यांनी हा आदेश देताना आरोपींनी तपासात पूर्ण सहकार्य करणे, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

रझा रफीक मेमन, आसिफ आफताब अन्सारी, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, शफी भिकन शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार यांच्या जामीन अर्जांना न्यायालयाने मंजुरी दिली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना हा दिलासा मिळाला आहे.

जामीन दिल्यास आरोपी साक्षीदारांना धमकावतील किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करतील, अशी ठोस शक्यता सध्या दिसून येत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तपास यंत्रणेकडून आवश्यक तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याची जबाबदारीही आरोपींवर राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आरोपींसाठी बंधनकारक राहणार आहे.

तसेच तक्रारदार महिलेच्या कार्यस्थळाजवळ किंवा राहत्या परिसरात जाने, तिच्याशी अथवा प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क साधणे आणि संबंधित कोणत्याही व्यक्तीशी संपर्क ठेवण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुराव्यांचीही पडताळणी सुरू

टीसीएस नाशिक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ, सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळाशी संबंधित एकूण नऊ गुन्ह्यांचा विशेष तपास पथक तपास करीत आहे. तपासाच्या अनुषंगाने अनेक संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून, विविध तांत्रिक व दस्तऐवजी पुराव्यांचीही पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणानंतर कंपनीने कोणत्याही प्रकारच्या छळवणूक किंवा सक्तीविरोधात 'शून्य सहनशीलता' धोरण असल्याचे स्पष्ट केले असून, लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये नाव आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT