नाशिक

Farmer Crisis 2026 | पावसाने दडी मारल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात; पिके करपण्यास सुरुवात

Farmer Crisis 2026 | मोसम खोऱ्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

जायखेडा : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस पिकांची कोवळी रोपे करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रारंभी झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून बियाणे, खते व इतर कृषी साहित्य खरेदी करत पेरण्या पूर्ण केल्या. उगवलेल्या पिकांमुळे समाधानाचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे-खते, औषधांचा खर्च, मजुरीची टंचाई आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुबार पेरणी करावी लागल्यास त्यासाठी आवश्यक भांडवल कुठून उभे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

याशिवाय, शेतीमालाला हमीभाव मिळेल की नाही, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव मात्र अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने शेती परवडेनाशी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रारही केली जात आहे. कर्जमाफी, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी अडकून पडत असल्याचे चित्र आहे.

मोसम खोऱ्यातील परिस्थिती लक्षात घेता पावसाअभावी बाधित क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करावे, दुबार पेरणीसाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, पीकविमा दाव्यांचा तात्काळ निपटारा करावा आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सध्या तरी मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, वेळेत पाऊस झाला तरच खरीप हंगाम सावरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

दुबार पेरणीचे वाढते संकट

  • सात-आठ दिवसांपासून पावसाची उघडीप.

  • मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस पिके धोक्यात.

  • जमिनीतील ओलावा कमी; रोपे करपू लागली.

  • शेतकऱ्यांसमोर अतिरिक्त खर्चाचे संकट.

  • वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT