जायखेडा : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील आनंदपूर गावात मुसळधार पावसानंतर करंजाडी नदीवरील फरशी पूल वाहून गेल्याने गावाचा बाहेरील संपर्क तुटला असून, त्याचा सर्वाधिक फटका शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसत आहे. सुरक्षित मार्ग नसल्याने पालकांना दररोज मुलांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील मुख्य रस्ता खचल्याने विद्यार्थ्यांचा शाळेचा नियमित मार्ग बंद झाला आहे. शाळेची वेळ झाली की, पालक एका हातात मुलांचे दप्तर आणि दुसऱ्या हाताने मुलाला सांभाळत वाहत्या पाण्यातून नदी पार करत असल्याचे हृदयद्रावक चित्र दररोज पाहायला मिळत आहे. शिक्षण खंडित होऊ नये म्हणून पालक जीव धोक्यात घालून हा संघर्ष करत आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी अनेक पालकांना स्वतःची शेती आणि मजुरीची कामे सोडावी लागत आहेत. त्यामुळे शेतीची कामे रखडत असून, आर्थिक फटकाही बसत आहे. शिक्षण आणि उदरनिर्वाह या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये पालकांची मोठी कसरत सुरू आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पूल वाहून गेल्यानंतर संबंधित विभाग व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप पर्यायी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही किंवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामालाही गती मिळालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, शासन शिक्षणाचा अधिकार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या घोषणा करत असताना आनंदपूरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुलाचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित रस्ता उपलब्ध करून न दिल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पालकांसमोर उदरनिर्वाहाचे संकट
विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांना शेती व मजुरीची कामे सोडावी लागत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असून शेतीची कामेही रखडली आहेत. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यामध्ये पालकांची मोठी कोंडी झाली आहे.
४० ते ५० विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
आनंदपूर गावातील सुमारे ४० ते ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज बाहेरगावी जातात. फरशी पूल वाहून गेल्याने त्यांचा शाळेचा मार्ग बंद झाला असून, पालकांना मुलांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
"रोज मुलांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागते. शिक्षण थांबू नये म्हणून जीव धोक्यात घालतो, प्रशासनाला काहीच सोयरसुतक नाही. तातडीने रस्ता सुरू करावा."- शरद भामरे, पालक
"आनंदपूर परिसरातील फरशी पूल व रस्ता वाहून गेल्याची घटना गंभीर आहे. संबंधित विभागाला तातडीने पाहणी करून आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे."- कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण