नाशिक

विधानसभा निवडणूक 2024 | निमित्त मतदार नोंदणीचे; इच्छुकांना वेध विधानसभेचे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभेसाठी इच्छुक तयारीला लागले असून, मतदार नोंदणी अभियानानिमित्त इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. सध्या बहुतांश विधानसभा क्षेत्रांत मतदार नोंदणीसाठी आवाहन करणारे होर्डिंग्ज उभारण्यात आले असून, त्यावर इच्छुकांची छबी झळकत आहे. मतदारसंघात क्वचितच दिसणारे इच्छुक होर्डिंग्जवर झळकत असल्याने, अनेकांना आश्चर्य वाटत आहे, तर हे होर्डिंग्ज अनेकांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल दर्शविणारे ठरत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वेध लागले असून, त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. पक्षातील वरिष्ठांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात असून, प्रबळ दावेदारांची चाचपणीही केली जात आहे. अशात इच्छुकांनी आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून देण्यासाठी, मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यासह पक्षातील वरिष्ठांना आपणच दावेदार असल्याचे दाखवून देण्याची धडपड सुरू केली आहे. सध्या मतदार नोंदणी अभियानावर इच्छुकांकडून सर्वाधिक भर दिला जात असून, मतदार नोंदणीसाठी आवाहन करणारे होर्डिंग्ज जागोजागी उभारले आहेत. नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी तसेच ज्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही अशांनी नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन इच्छुकांकडून केले जात आहे. काही इच्छुकांनी यासाठी शिबिरांचेच आयोजन केले असून, त्याठिकाणी संपूर्ण यंत्रणा उभारून मतदारांची नोंदणी केली जात आहे. अर्थात हा सर्व आटापिटा केला जात असला, तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून असणार आहे.

आषाढी वारीसाठी पुढाकार

आमदारकीस इच्छुक असलेल्यांनी गेल्या आषाढी वारीनिमित्त मतदारसंघात विविध उपक्रम राबविले. वारकऱ्यांना छत्री, रेनकोटसह भेटवस्तू देण्याबरोबरच, मतदारसंघातील नागरिकांना मोफत पंढरपूर वारीदेखील या काळात घडवून आणली. याव्यतिरिक्त गुणवंतांचा सत्कार, ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरे, महिलांंसाठी विविध स्पर्धा यांसारखे उपक्रम इच्छुकांकडून राबविले जात आहेत. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा इच्छुकांचा प्रयत्न असला, तरी उमेदवारी मिळवून आणण्याचे खरे आव्हान इच्छुकांसमोर आहे.

अगोदर पक्ष ठरवा, मगच...

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवाराने शहरभर मतदार नोंदणी अभियानाचे आवाहन करणारे होर्डिंग्ज उभारले. मात्र, हा इच्छुक नेमका कोणत्या पक्षात असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 'अगोदर पक्ष ठरवा, मगच पुढचं बोला' असा सल्लाही अनेकांकडून त्यांना दिला जात आहे. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी असून, प्रत्येकाकडूनच उमेदवारीसाठी दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षांतराबरोबरच बंडखोरी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT