सिन्नर (नाशिक) : श्री राजा शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ सिन्नर या संस्थेच्या प्राथमिक आश्रमशाळा वावी व माध्यमिक विद्यालय विंचूरदळवी या शाळांमधील गंभीर गैरव्यवहार उघड करत संस्थापक अध्यक्ष व आजीव सभासद दिगंबर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले.
संस्थेवर आरोप करणारे दिगंबर देशमुख हे स्वत: भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळेच सभासदांनी त्यांना संस्थेबाहेर काढले असून, दोन वर्षांपूर्वी ठराव करून त्यांचे सभासदत्वदेखील रद्द केलेले आहे. संस्थेला 120 पट मंजूर असून, सध्या 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यभरातील कुठलेही पात्र विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेऊ शकतात. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही.साहेबराव गुंजाळ, अध्यक्ष, श्री राजा शिवछत्रपती शिक्षण प्रसारक संस्था
संस्थेतील भ्रष्टाचारात थेट संस्थाचालकांचा सहभाग असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. संस्थेकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना बनावट कागदपत्रे तयार करून डुप्लिकेट सभासद दाखवले जातात. त्यांच्याकडून पैसे घेऊन पदाधिकारी ने ले जातात आणि त्याद्वारे संस्थेतील भ्रष्ट कारभार राबवला जातो, असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक आश्रमशाळा वावी ही विनाअनुदान तत्त्वावर मान्यताप्राप्त झाली. मात्र, गेल्या दोन दशकांपासून संस्थेच्या नावावर बोगस विद्यार्थी दाखवून शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान उचलले जात आहे.
ऊसतोड कामगारांची व जालना, छत्रपती संभाजीनगर धाराशिव, बीड, पालघर, अहिल्यानगर, पुणे आदी जिल्ह्यांतील मुले दाखवून शासकीय अनुदान लुटण्यात आले. त्यामुळे समाजकल्याण विभागाने चौकशी करून संस्थेचे पदाधिकारी व चालकांविरुद्ध महिनाभरात गुन्हा दाखल न केल्यास, संबंधित शासकीय अधिकार्यांवरही गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हेगारांना पाठीशी घालणार्यांनाही आम्ही जबाबदार धरू, असा इशारा देशमुख यांनी दिला. यावेळी वावी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक वेलजाळी उपस्थित होते. तथापि, संस्थेचे अध्यक्ष साहेबराव गुंजाळ व प्रभारी मुख्याध्यापक रमेश लांडे यांनी संस्थेत कुठलाही भ्रष्टाचार नसल्याचे स्पष्ट करीत देशमुख यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
देशमुख यांनी माहिती अधिकारातून मिळवलेले कागदपत्र सादर करत ते या कालावधीत शाळेतील कर्मचार्यांवर व शालेय खर्चांवर दाखवलेले अवास्तव आकडे मांडले. या आकड्यांवरून शालेय गरजांच्या तुलनेत प्रचंड जास्त खर्च दाखवून शासकीय अनुदानाचा गैरवापर झाल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.