नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी वसतिगृहातील असुविधांविरोधात आदिवासी जैन झीच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी (दि. १६) जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये भेटी दिल्या. याप्रसंगी आक्रमक झालेल्या डॉ. उईके यांनी असुविधांबाबत वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना दोषी धरले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्यास निलंबनासह गडचिरोलीला बदली करेन, असा सज्जड दम मंत्री उईके यांनी दिला.
आदिवासी विकासमंत्री उईके यांनी बुधवारी (दि. १६) दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव शासकीय आश्रमशाळा आणि सुरगाणा तालुक्यातील माणी उच्च माध्यमिक शाळा व वसतिगृहांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माणी येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उईके म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन मोठा खर्च करते. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याची जी स्वप्ने पाहिली आहेत, ती साकारण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे उईके यांनी सांगितले. आश्रमशाळेतील एखादी विद्यार्थिनी आजारी पडल्यास तिला तातडीने दवाखान्यात दाखल करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे.
अशा बाबतीत दुर्लक्ष झाल्यास संबंधितांना माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शाळेतील अंतर्गत राजकारण, मतभेद किंवा कर्मचाऱ्यांमधील वादाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होता कामा नये. राजकारण बाहेर करा. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्या, असेही खडे बोल त्यांनी सुनावले.
अनधिकृत गैरहजेरीबाबतही उईके यांनी कठोर भूमिका घेतली. तीन ते सात दिवस गैरहजर राहणे किंवा कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे खपवून घेतले जाणार नाही. केंद्रीय स्वयंपाकघरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असल्यास त्याचीही जबाबदारी निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रभारी आयुक्त गोपीचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी काश्मिरा संख्ये, भाजप आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस एन. डी. गावित, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदी उपस्थित होते.