Ashok Kharat case
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत. खरातच्या मोबाइलमधील दोन हजारांहून अधिक संपर्क क्रमांक 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह केल्याची बाब उघड झाल्याने विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक नंबरच्या मागे नेमकी कोणती व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणावर भर दिला जात आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, खरातने आपल्या मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींचे संपर्क थेट नावाने सेव्ह न करता वेगवेगळ्या कोडवर्डच्या स्वरूपात जतन केले होते. त्यामुळे त्या संपर्काची ओळख पटवणे अवघड झाले असून, या प्रक्रियेस वेळ लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कोडवर्डचा उलगडा झाल्यास अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खरातने आपल्या तथाकथित 'भक्त परिवारा'तील व्यक्तींची नावे कधीही सार्वजनिकपणे उघड केली नव्हती. विशेष म्हणजे, तो सोशल मीडियापासूनही दूर राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. साधारणपणे अशा प्रकारचे भोंदू स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी मोठ्या व्यक्तींशी असलेले फोटो आणि संपर्क सोशल मीडियावर प्रसारित करत असतात. मात्र, खरातच्या बाबतीत असे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.
यामुळे खरातने जाणीवपूर्वक गुप्तता राखत आपले जाळे उभे केले असल्याचा संशय अधिक बळावला आहे. तपास यंत्रणा आता डिजिटल पुरावे, मोबाइल डेटा आणि संपर्क साखळी यांचा सखोल अभ्यास करत असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.