नाशिक : भोंदू अशोक खरात याने पोलिस चौकशीतील दबाव टाळण्यासाठी आता 'मला काही आठवत नाही' असा नवा डाव खेळण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. १८ मार्चपासून पोलिस कोठडीत असलेल्या खरातची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी सुरू असून, सुरुवातीला उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता थेट स्मरणशक्ती हरवल्याचा बहाणा करत असल्याने तपास यंत्रणाही सतर्क झाली आहे.
महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या खरातला २४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात एका महिलेला गुंगीचे द्रव्य देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी कोठडीची मागणी केली होती.
याआधीही खरातने डोकेदुखी, पोटदुखी व मळमळ होत असल्याचे सांगत उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा मार्ग अवलंबला होता. काही काळ त्याला ऑक्सिजनवरही ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुन्हा कोठडीत आणल्यानंतर आता 'गजनी' शैलीत विस्मरणाचा बहाणा केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे ८ आणि आर्थिक फसवणुकीचे ९ गुन्हे दाखल असून, अध्यात्माच्या आडून फसवणूक व शोषण केल्याचा आरोप आहे. सरकारवाडा पोलिसांकडून त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी सुरू आहे.