Ashok Kharat Nashik Case  
नाशिक

Ashok Kharat Nashik Case | खरात प्रकरणात चाकणकरांची 'दलाला'ची भूमिका

राष्ट्रवादी नेत्याकडून गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर या 'दलाल' म्हणून कार्यरत होत्या. महिला आयोगाकडे येणाऱ्या महिलांना खरातकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणात चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चित्रफिती समोर आणा, चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी देखील ठोंबरे यांनी केली आहे.

खरात प्रकरणाबाबत ठोंबरे यांनी शुक्रवारी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर याच हे सर्व रॅकेट चालवत होत्या, त्यांना अटक करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की, झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी रूपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिर्डी, आर्वीमध्ये जो इतरांवर जो गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या दबावानेच दाखल झाला होता, असा दावा त्यांनी केला. राज्य महिला आयोगाकडे आलेल्या महिलांचे समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करून घ्या, असे बाबा आहेत. असे करून ते प्रकरण वर्ग केले जात होते, असा दावाही ठोंबरे यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण एसआयटीकडे गेले असले तरी रूपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे, त्यांनाही आरोपी करणे गरजेचे आहे, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

केसरकर, चाकणकर यांना सह आरोपी करा

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण केवळ महिलांच्या लैंगिक छळापुरते मर्यादित नसून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करत याप्रकरणात तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व रूपाली चाकणकर यांची चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी नाशिक पोलीस आयुक्त, तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटी प्रमुखांकडे केली आहे. जर दीड वर्षांपासून हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते तर त्यांनी वेळीच खरातला चाप का लावला नाही? हा भस्मासूर (अशोक खरात) कोणी पोसला? त्याला पैसा-अडका कोणी दिला? अशा प्रश्नांची सरबत्ती अंधारे यांनी केली. खरातसोबत माजी खासदार हेमंत गोडसे यांचा एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील फोटो दाखवत यांचा खरातशी काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.

खरात प्रकरणात उपनेत्या अंधारे यांनी शुक्रवारी (दि. २७) नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. त्यानंतर शालिमार येथील शिवसेना (उबाठा) च्या मध्यवर्ती कार्यालयातील पत्रकार परिषदेत अंधारे यांनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या सिन्नर एमआयडीसीतील भेटीचे आणि बैठकीचे फोटो दाखवताना शिक्षणमंत्र्यांचा एमआयडीसीतील स्टाफशी काय संबंध, असा सवाल केला. भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचे अशोक खरातसोबतचे फोटो दाखवताना 'माझ्या नेत्यावर (उद्धव ठाकरे) ताज हॉटेलमध्ये बसल्याचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आता या फोटोंचे उत्तर द्यावे,' असा जाबही त्यांनी विचारला.

रूपाली चाकणकर, तटकरे आणि चौधरी यांच्यातील कथित आर्थिक संबंधांवरून अंधारे यांनी गंभीर आरोप केले. रूपाली चाकणकर यांचे पती नीलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे. चौधरी हे तटकरेंचे भागीदार आहेत आणि तेच चौधरी चाकणकरांचेही भागीदार आहेत, तर मग चाकणकर आणि तटकरे यांच्यात काय संबंध आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नीलेश चाकणकर आणि चौधरी यांचा हा प्रकल्प तब्बल ४५० ते ५०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगत इतकी मोठी आर्थिक कुवत या लोकांकडे आली कुठून? असा सवाल करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले. खरातच्या 'शिविका ट्रस्ट'ला पाणी देण्याच्या निर्णयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट संबंध नव्हता, असे स्पष्ट करताना खरात प्रकरण माहिती असूनही विद्यमान गृहमंत्र्यांनी २०२४ मध्ये खरातच्या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण कसे केले, असा सवालही अंधारे यांनी केला.

चाकणकर-अनु मलिक कनेक्शन!

लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या संगीतकार अनू मलिक यांना महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांनी क्लीन चीट दिली होती. कारण, अनू मलिक यांच्या प्रॉडक्शनचा एक सिनेमा तयार झालेला, ज्यामध्ये रूपाली चाकणकर यांच्या मुलाला (सोहम) काम मिळाले. महिलांना न्याय देण्याऐवजी चाकणकर अशा प्रकारे डील करत असतील, तर हे वाईट आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत त्यांनी पुरावे दाखल केले.

खरातची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह

नाशिक : अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरातची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाच्या तपासात ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित अहवालानंतर काही प्रमाणात स्पष्टता आली आहे. अशोक खरातवर गंभीर आरोप आहेत की, गुंगीचे औषध देऊन महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून पीडित महिलांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे का, याची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात एचआयव्ही चाचणीला विशेष महत्त्व देण्यात आले होते. रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या संदर्भातील संभाव्य आरोग्य धोका नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी प्रकरणातील गांभीर्य कमी झालेले नाही. कारण महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे हा गुन्हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मानला जात आहे. पुढील घडामोडींवर राज्यभरातून लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT