चंद्रशेखर बावनकुळे  (File photo)
नाशिक

Nashik Ashok Kharat Case | खरातच्या साथीदारांना नोकरीतून काढणार! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'बडतर्फी'चा थेट इशारा

Nashik Ashok Kharat Case | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केवळ बदलीची कारवाई न करता, थेट बडतर्फी करण्यात येईल, मग ते कोणत्याही खात्यातील असोत, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. राज्यात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

आता या प्रकरणात अशोक खरातच्या मोबाइल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आले. त्यात काही दिग्गज नेते तसेच शासकीय अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याची माहिती मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. खरात प्रकरण हे राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारे गंभीर प्रकरण असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत असून, कारवाई योग्य दिशेने सुरू आहे.

ज्या नागरिकांकडे किंवा संबंधितांकडे कोणतेही ठोस पुरावे असतील, त्यांनी ते एसआयटीकडे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणात कोणीही सुटणार नाही. एसआयटी तपासात ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमच्या विभागातील अधिकाऱ्यांनी खरातला मदत केली

असेल, तर त्यांनाही नोकरीत ठेवले जाणार नाही, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. अशोक खरातला जमिनी व मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती व अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित भागातील सर्व व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार असून, दोषींवर कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती नाही

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे अशोक खरातच्या कॉल रेकॉर्डची माहिती कशी पोहोचली, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री कार्यालय अशा प्रकारची संवेदनशील माहिती देत नाही.

ही बाब अत्यंत संवेदनशील आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून, अशी माहिती दिली जाण्याची शक्यताही नाही. दमानिया यांनी ही माहिती स्वतः मिळवली असावी. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी एसआयटीकडे सुपूर्द करावी. या प्रकरणात कोणत्याही स्तरावर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चारही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT