नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अशोक खरात प्रकरणातील लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता त्याचा काळाबाजार सुरू झाल्याचे समोर आले आहे. टेलिग्रामसारख्या अॅपवर हे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्यांची लिंक मिळवण्यासाठी २५ ते ५० रुपये आकारले जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे ४६५० हून अधिक लिंक इंटरनेटवरून हटवल्या आहेत. तरीदेखील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओ पुनःपुन्हा प्रसारित होत असल्याचे दिसून येत आहे. काही जण गुप्त ग्रुप तयार करत पैसे घेऊन हे व्हिडिओ शेअर करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. यामुळे पीडित महिलांची ओळख आणि गोपनीयता धोक्यात येत असून, हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संबंधितांविरोधात आयटी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये किंवा त्या पुढे शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारची माहिती आढळल्यास पोलिसांना तत्काळ कळवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.