Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case Update: कोठडी वाढवली, चौकशी सुरूच

Ashok Kharat|खरातला पुन्हा तीन दिवस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदू अशोक खरातला याला सहाव्या गुन्ह्यात न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे खरातला आणखी काही काळ पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणात त्याचा ताबा घेतला असून, २६ एप्रिलपर्यंत कोठडी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. खरातवर आतापर्यंत तब्बल १२ गुन्हे दाखल असून, विविध महिला अत्याचार प्रकरणांमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. यापूर्वीच्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

दरम्यान, कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात एका महिलेला गुंगीचे औषध देऊन आणि पेढा खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी 'एसआयटी ने न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पीडितेला घाबरवले, तसेच तिच्या कुटुंबीयांविषयी भीती दाखवून तिचा गैरफायदा घेतला.

पीडितेला दिलेल्या पदार्थांमध्ये काय होते, तसेच या प्रकरणातील इतर बाबींचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीचा प्रत्यक्ष ताबा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आरोपीच्या वकिलांनी या मागणीला जोरदार विरोध करत, प्रत्येक वेळी त्याच कारणांवर पोलिस कोठडी मागितली जात असल्याचा आरोप केला. या प्रकरणात नवीन काहीही समोर आलेले नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या आणून दिले.

आणखी धक्कादायक खुलासे होणार?

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत तपासासाठी आरोपीचा ताबा आवश्यक असल्याचे मान्य केले. त्यानुसार खरातला याला २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धनची पुन्हा चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाचा फास आणखी घट्ट होत असून, त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याची विशेष तपास पथकाने पुन्हा चौकशी केली आहे. मालमत्तेचे व्यवहार आणि इतर आर्थिक बाबींसंदर्भात ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही त्याची चौकशी करण्यात आली होती, मात्र, तीन तासांच्या चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले होते. आता पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याने या प्रकरणात नवीन धागेदोरे मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खरात याच्याविरुद्ध महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.

१८ मार्चपासून तो पोलिस कोठडीत असून, त्याला अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. याच प्रकरणात शिर्डीतील भूखंड बळकावल्याच्या आरोपावरून त्याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहता न्यायालयाने २४ एप्रिल रोजी तिचा जामीन अर्ज फेटाळल्याने तिच्या अटकेची शक्यता अधिकच वाढली आहे. सध्या ती फरार असल्याची माहिती आहे.

गायब असल्याची चर्चा निष्फळ

काही काळ हर्षवर्धन खरात गायब असल्याची चर्चा होती. मात्र, तो पुण्यातील महाविद्यालयीन कामानिमित्त गेला असल्याचे नंतर स्पष्ट झाले असून, त्याबाबत त्याने 'एसआयटी' माहिती दिली होती. आता पुन्हा त्याची चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत या चौकशीमधून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT