नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अन्य आरोपांशी संबंधित जवळपास १९ गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम आणि अॅड. अजय मिसर उपस्थित होते. अशोक खरात यांच्या बाजूने अॅड. राहुल कासलीवाल यांचे सहकारी दोन्ही बाजूंकडून पुढील सुनावणीसाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. पूरवार यांच्या न्यायालयात पार पडली.
खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या मोठी असल्याने तसेच प्रकरणात विविध गंभीर आरोप करण्यात आल्याने त्याच्या जामीन अर्जाकडे कायदेवर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरोधात महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अन्य स्वरूपाचे आरोप असलेले गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येते. अटक झाल्यानंतर विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याला वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार तो सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे.
दरम्यान, खरातविरोधातील प्रकरणाची व्याप्ती पोलिस तपासापुरती मर्यादित राहिलेली नाही. आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाकडूनही त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांमधील आरोप, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे विविध यंत्रणांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खरातच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.