नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क । नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले (वय 52) आणि कल्पना कैलास उगले या शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापुजेचा मान मिळाला आहे. उगले हे जातेगाव ता. नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत. गेली 12 वर्षे ते विठ्ठलाची सलग वारी करत आहेत. कैलास उगले यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत.
पांडुरंगाच्या मुख्य पुजाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आणि अन्य उपस्थित होते.
पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे (वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे (वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) या दापत्याची मागील वर्षी 2024 मध्ये निवड करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील वारकरी दांपत्याला हा मान मिळाला आहे. तर 2023 मध्येही कार्तिकी एकादशीला एकादशीच्या महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला होता.
आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात 15 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.