

भुसावळ (जळगाव) : आषाढी एकादशी निमित्त जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी शनिवार (दि. ५) भुसावळ रेल्वे स्थानकावरून अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने मोठ्या उत्साहात रवाना झाले.
या आषाढी रेल्वे गाडीला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी भुसावळ रेल्वे मंडळाच्या व्यवस्थापक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महायुती व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष गाडीची मागणी केली होती, ज्यावर तत्काळ निर्णय घेऊन ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अनारक्षित गाडीतील जनरल तिकीटांची संपूर्ण खरेदी खडसे यांनी स्वखर्चाने केली असून ही सेवा वारकऱ्यांसाठी मोफत ठेवण्यात आली आहे.
भुसावळहून दुपारी 1.30 वाजता निघालेली गाडी रविवार (दि. 6) रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचेल, तर परतीचा प्रवास त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता सुरू होऊन सोमवार (दि. 7) रोजी भुसावळमध्ये परत येईल.
पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांशी रक्षा खडसे यांनी संवाद साधत त्यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी पावसानेही उपस्थिती नोंदवत वातावरण अधिक भक्तिमय झाल्याचे पहावयास मिळाले.