Unseasonal Rain : कळवण तालुक्यात तब्बल ५०२० हेक्टर शेतीचे नुकसान File Photo
नाशिक

Unseasonal Rain : कळवण तालुक्यात तब्बल ५०२० हेक्टर शेतीचे नुकसान

अवकाळीचा फटका; १५ हजार ६०० शेतकरी बाधित

पुढारी वृत्तसेवा

As many as 5020 hectares of agriculture damaged in Kalvan taluka

कळवण : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे १२० गावे बाधित झाली असून, सुमारे ५०२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार समोर आला आहे. या आपत्तीचा फटका तब्बल १५ हजार ६०० शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे कांदा, कांदारोप, बाजरी, भात, मका, सोयाबीन आदी प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नुकसानीचा पंचनामा युद्धपातळीवर करत आहेत. प्राथमिक अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार नुकसानीचा हा अंदाज पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. पिके वाया गेल्याने शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मेहनतीचे मोल गेले असून, कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी संघटना आणि शेतकरी वर्गाने केली आहे.

अवकाळी पावसाच्या या फटक्याने कळवण तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा एकदा शेतीच्या असुरक्षिततेसमोर उभा राहिला आहे. शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत, बियाणे व खतांचा पुरवठा आणि पुनर्लावणीसाठी आवश्यक सहाय्य मिळावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही पातळ्यांवर तातडीचे उपाय हाती घेणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे.

दि. २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेता शासनाने तत्काळ मदतीचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
- नितीन पवार, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT