अंदरसुल ; येवला तालुक्यातील कोळम या ठिकाणी आवारे वस्तीवर(दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील 50 हजार रुपये रोकड चोरून नेली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की उकाड्याचे दिवस असल्यामुळे घराबाहेर ओट्यावर रात्री आवारे कुटुंबातील पुरुष झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर या दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतिचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा अधिक तपास करीत आहेत.