

नागपूर : नागपुरातून बिलासपुरला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स लुटल्याची घटना छत्तीसगडमध्ये राजनांदगाव परिसरात उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये तसेच खासगी बसेसने प्रवास करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता जागीरदार कंपनीची ट्रॅव्हल्स नागपुरातून काही प्रवासी घेऊन बिलासपुरकडे निघाली होती. काही वेळात चेहऱ्याला दुपट्टा बांधलेल्या चार दरोडेखोरांनी बस थांबवली. चौघे बसमध्ये घुसले आणि प्रवाशांना बस आपल्या ताब्यात असल्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी प्रवाशांकडून दागिने, रोख रक्कम लुटली. त्यानंतर मध्येच बस थांबवून दरोडेखोर पसार झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चालकाने बस थेट राजनांदगावमधील कोतवाली पोलीस ठाण्यात नेली. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही. दरोडेखोर नेमके कोणत्या ठिकाणाहून बसमध्ये घुसले याची माहिती सीसीटीव्ही तपासून पोलीस घेत आहेत.