Crime File Photo
नाशिक

Nashik Crime|७० लाखांच्या अपहारप्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

७० लाखांच्या अपहारप्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळ संचालित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बँक खात्यांतून ७० लाख ८२ हजार ६१६ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपप्रकरणी मुख्य संशयित माजी मुख्याध्यापक ज्ञानदेव दामू पाटील, त्यांची पत्नी कमल ज्ञानदेव पाटील आणि सून प्रियंका चिंतामण गांगुर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हा निर्णय दिला. शैक्षणिक संस्था आणि शासकीय अनुदानाच्या निधीचा अपहार हा गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच अंतरिम दिलासा १५ दिवसांनी वाढवून देण्याची आरोपींची विनंतीही अमान्य केली आहे. त्यामुळे तिघांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.

टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जिभाऊ नारायण शेवाळे (८४) यांनी मालेगाव छावणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव पाटील हे संस्थेचे सचिव होते. तसेच २००८ पर्यंत त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली होती

सेवानिवृत्तीनंतर कोणताही कायदेशीर अधिकार नसतानाही पाटील यांनी पंजाब नॅशनल बँकेतील वेतनेतर अनुदान खाते, कनिष्ठ महाविद्यालयाचे खाते आणि शालेय पोषण आहार खात्यातून रक्कम काढल्याचा आरोप आहे. ही रक्कम स्वतःच्या, पत्नीच्या आणि सुनेच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली तसेच काही रक्कम रोख स्वरूपात काढण्यात आली. यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आरोपांचे गांभीर्य आणि शैक्षणिक संस्थेच्या तसेच शासकीय अनुदानाच्या निधीशी संबंधित गैरव्यवहाराचे स्वरूप लक्षात घेता, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला

ऑडिटमध्ये ७०.८२ लाखांचा गैरव्यवहार उघड

सन २०१७ पासून संस्थेच्या बँक खात्यांचे लेखापरीक्षण केले असता, एकूण ७० लाख ८२ हजार ६१६ रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्याचे सांगण्यात आले. ज्ञानदेव पाटील, कमल पाटील, प्रियंका गांगुर्डे यांच्यासह मॅनेजिंग ट्रस्टी आणि इतरांच्या खात्यांवर मोठ्या प्रमाणात रक्कम रोख स्वरूपात तसेच थेट बँक खात्यांद्वारे वर्ग करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT