नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात वेगवेगळ्या समाजांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू असून, कुणबी - मराठा, आदिवासी - धनगर समाजाप्रमाणे आता अनुसूचित जातींमध्येही उपवर्गीकरणाच्या माध्यमातून फूट पाडण्याचे राजकीय षडयंत्र सुरू असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केला. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अधिकार संसदेला असताना सुप्रीम कोर्टाने हा अधिकार कसा दिला? असा प्रश्न उपस्थित करतानाच, असा अधिकार देणे सुप्रीम कोर्ट खरोखरच सुप्रीम राहिले आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये शनिवारी (दि. ३) अनुसूचित जातींतील विविध घटकांनी एकत्र येऊन बी. डी. भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्च्यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर चंद्रकांत ठाकुरे, सुरेश माने, किशोर घाटे, अविनाश शिंदे, कुणाल वाघ, दत्तात्रय गोतिसे, सुशील सूर्यवंशी, अमर कसबे, गणेश उन्हावणे, शशी उन्हावणे, रुक्मिणी लोंढे आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले की, उपवर्गीकरणाविरोधात राज्यभर मोर्चे काढतही सरकार ऐकणार नसेल, तर हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर २९ लाख आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा काढू, तसेच विधानभवनाला घेरावाचा इशाराही त्यांनी दिला.
मोर्च्यात सहभागी आंदोलकांना विचारताना उपवर्गीकरणाचे समर्थन करणारे सचिन साठे यांना लक्ष्य केले, तसेच मंत्री छगन भुजबळ या मंचावर का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करतानाच आपण ज्यांना मतदान केले, त्यांना जाब विचारला पाहिजे, असा सल्लाही व्यासपीठावरून मान्यवरांनी व्यक्त केला.
भर उन्हात घोषणाबाजी:
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोधासाठी पुकारलेल्या मोर्च्यात अनुसूचित जातींतील विविध घटकांनी सहभाग नोंदवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेला मोर्चा बी. डी. भालेकर मैदानावरून शालिमार, एम. जी. रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय व सीबीएस येथे पोहोचला. या ठिकाणी जाहीर सभेने मोर्च्याचा समारोप झाला. दरम्यान, उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पांढरे पोशाख अन् निळ्या टोप्यांनी वेधले लक्ष:
मोर्च्यात सहभागी आंदोलकांनी पांढरे व निळे पोशाख परिधान करीत मोर्च्याचे वेगळे दृश्य निर्माण केले. 'संविधानाविरोधात जाणार नाही', 'आरक्षणाचे उपवर्गीकरण मान्य करणार नाही', 'समाजात फूट पडणार नाही',
'दलित समाजाचा एकच निर्धार, उपवर्गीकरणाचा जोरदार प्रतिकार' अशा घोषणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष, भीमगीतांनी शनिवारी (दि. ३) परिसर दुमदुमला होता. हातात निळे झेंडे, संविधानाच्या प्रती आणि विविध घोषणा फलक घेतलेले आंदोलक लक्ष वेधून घेत होते. मोर्च्यातील गर्दीचे नियोजन आणि शिस्त राखण्यासाठी समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
उपवर्गीकरणामागे एकनाथ शिंदे : सदावर्ते:
सध्या उपवर्गीकरणाचे राजकारण सुरू असून, या राजकारणामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. मराठा आणि मातंग समाजाला एकत्र करून राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच, यातून मातंग समाजाचे नुकसान होईल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच मातंग समाज पूर्वीपासून हलगी वाजवून दवंडी देण्याचे काम करीत असल्यामुळे तो सतत सहभागी होता. या आधारे त्यांचे अनुसूचित जातीतील स्थानही धोक्यात येईल, तसेच सरकारने आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतल्यास विरोधात न्यायालयात उभे राहून ४८ तासांत निर्णय रद्द करू, असा दावाही त्यांनी यावेळी केला. उपवर्गीकरण होऊ देणार नाही, असे आश्वासन सदावर्ते यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.