नाशिक : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दूरवस्था राज्याच्या विधिमंडळात पोहोचल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. अंबड एमआयडीसीमधील पॉवर हाऊस ते लुसी कंपनी, गंगाविहार हॉटेल ते आरपी स्वीट परिसरातील विविध ठिकाणच्या रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण, अस्तरीकरणासाठी ६.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.
महापालिका क्षेत्रात मुलभूत सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून खड्ड्यांमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील कामगार वर्गाला खड्डेमय रस्त्यांचा मोठा फटका बसत आहे. त्याची दखल घेत आ. हिरे यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले होते.
औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर साचलेले पाणी निचरा होत नाही. सीएट कंपनीजवळ बॉक्स कल्व्हर्ट बांधण्याचे काम प्रलंबित असल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे, याविषयी देखील आ. हिरे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नांबाबत विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवत माहिती मागविली होती. यानंतर महापालिका प्रशासनाने अंबड औद्योगिक वसाहतीतील नादुरूस्त रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग २७ मधील अंबड एमआयडीसीमधील पॉवर हाऊस ते लुसी कंपनी, गंगाविहार हॉटेल ते आरपी स्वीट परिसरातील विविध ठिकाणच्या रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण, अस्तरीकरण केले जाणार आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मधील समर्थनगर, ज्ञानेश्वरनगर, मुरलीधर नगर, थॉमस स्कूल जवळील परिसरातील रस्ते खडीकरण व डांबरीकरण केले जाणार आहेत. यासाठी ३.५० कोटींचा प्रस्ताव बांधकाम विभागाने महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.